प्रसिध्द दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन
हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झालं आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश कौशिक यांच्या निधनामुळे मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून कित्येक बॉलिवूड सेलिब्रिटीजनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. दिल्लीमध्ये प्रवासादरम्यान सतीश यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं स्पष्ट झालं, आता त्यांचा मृतदेह मुंबईत आणणार असल्याची चर्चा होत आहे. सतीश यांच्यावर अंत्यसंस्कार मुंबईतच होणार असल्याची माहिती त्यांच्या घरच्यांनी दिली आहे.
सतीश कौशिक यांच्या कुटुंबीयांनी यासंदर्भात एक पत्रक जाहीर करून माहिती दिली आहे. या पत्रकात म्हंटल्याप्रमाणे आज संध्याकाळी ५ वाजता सतीश यांच्या पार्थिवार अंत्यविधी पार पडणार आहेत. वर्सोवा येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या चाहत्यांच्या दर्शनासाठी त्यांना आणणार आहेत. तर संध्याकाळी ५ वाजता वर्सोवा येथीलच हिंदू स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
सतीश कौशिक यांनी ‘हम आपके दिल में रहते हैं’, ‘हमारा दिल आपके पास है’, ‘मुझे कुछ कहना है’, ‘तेरे नाम’ आणि कागजसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. तर ‘मिस्टर इंडिया’, ‘राम लखन’, ‘जमाई राजा’, ‘मिस्टर और मिसेज खिलाड़ी’, ‘दिवाना मस्ताना’, ‘बड़े मियां छोटे मियां’,सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आजही त्यांच्या या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत आणि सदैव राहतील.