‘संभाजी भिड्यांचे पाय कापणाऱ्याला दोन लाखांचे बक्षीस देऊ’
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या विषयी आक्षेपार्ह विधान करणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे यांची मिशाच नव्हे तर त्यांचे पाय कापणाऱ्याला दोन लाख रूपयांचे बक्षीस देऊ, असे वादग्रस्त विधान एआयएमआयएम पक्षाच्या सोलापुरातील पदाधिका-याने केले आहे. भिडे यांचे पोलीस संरक्षण काढून त्यांना पाच मिनिटे आमच्या ताब्यात द्या, असेही जहाल विधान करण्यात आले आहे.
सोलापूर शहर जिल्हा एआयएमआयएमच्यावतीने मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे यांनी राष्ट्रपती महात्मा गांधीजींच्या विरोधात बेताल वक्तव्य केल्यानंतर राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना त्यात एआयएमआयएम पक्षाने भर टाकली आहे. सोलापुरात रेल्वे स्थानकासमोरील गांधीजींच्या पुतळ्याला या पक्षाच्यावतीने दुग्धाभिषेक घालून अभिवादन करण्यात आले. नंतर संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. पक्षाचे शहर सरचिटणीस कोमारे सय्यद, युवक अध्यक्ष मोहसीन मैंदर्गीकर, मच्छिंद्र लोकेकर, माजी नगरसेविका वाहिदाबानो भंडाले आदींचा या आंदोलनात सहभाग होता.
यावेळी बोताना संभाजी भिडे यांच्यासह राज्य व केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले. भिडे हे सातत्याने महापुरूषांच्या विरोधात अवमानकारक विधाने करतात. भारतीय तिरंगा ध्वजाचाही अपमान करतात. त्यांचे हे देशद्रोही कृत्य आहे. परंतु केवळ भाजप सरकार कारवाईविना मोकळे सोडल्यामुळे भिडे यांचे प्रस्थ वाढले आहे. त्यांची मिशी कापून आणण्यासाठीच नव्हे त्यांचे पायदेखील कापणा-याला दोन लाख रूपयांचे बक्षीस देऊ, असे वक्तव्य एआयएमआयएमचे युवक शहराध्यक्ष मोहसीन मैंदर्गीकर यांनी केले. तर मच्छिंद्र लोकेकर यांनी भिडे यांना मोठी अद्दल घडविण्याची भाषा केली. शासनाने भिडे यांचे पोलीस संरक्षण काढून त्यांना फक्त पाच मिनिटे आमच्या ताब्यात द्यावे. त्यांचे आम्ही काय करायचे ते करू, असे विधान केले.