२०२४ मध्ये आपणच पंतप्रधान होणार असल्याचा मोदींना विश्वास…
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशाला लाल किल्ल्यावरुन संबोधित केलं. १५ ऑगस्टच्या निमित्ताने देशाला त्यांचं हे दहावं संबोधन होतं. बिगर काँग्रेसी पंतप्रधानांपैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असे एकमेव पंतप्रधान आहेत ज्यांनी सलग दहावेळा लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या भाषणात दहा वर्षांच्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडला. तसंच काँग्रेसवर कडाडून टीका ही केली. भ्रष्टाचाराच्या राक्षसाने आपला विळखा देशाभोवती घातला होता आणि देशाला घट्ट पकडून ठेवलं होतं असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली. तर दुसरीकडे पुढच्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्येही आपणच लाल किल्ल्यावरुन भाषण करु असा विश्वासही व्यक्त केला.
“२०१४ मध्ये मी तुम्हाला परिवर्तन घडेल असं आश्वासन दिलं होतं. त्यावेळी तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलात आणि मला या सर्वोच्च पदावर बसवलं. २०१९ मध्ये तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर पुन्हा विश्वास दाखवला आणि आशीर्वाद दिला. आता २०२४ साठीही मला आशीर्वाद द्या. पुढच्या १५ ऑगस्टला मी पुन्हा तुमच्यासमोर येईन. मी तुमच्यासाठीच जिंकतो आहे, जिंकेन. मी जे कष्ट उपसतो आहे ते तुमच्यासाठीच आहेत. कारण सगळे भारतीय हे माझं कुटुंब आहेत. मी तुमचं दुःख सहन करु शकत नाही.” असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढच्या टर्ममध्येही आपणच पंतप्रधान असू हा विश्वास व्यक्त केला.