ऑस्करमध्ये भारतातर्फे ‘या’ मल्याळम सिनेमाची निवड…
नवी दिल्ली:
मल्याळम चित्रपट ऑस्करमध्ये करणार भारताचं प्रतिनिधीत्व
ऑस्कर २०२४ साठी भारताची अधिकृत एंट्री म्हणून चित्रपटाची निवड झाली आहे. यंदा एका मल्याळम चित्रपटाची निवड भारतातर्फे ऑस्करसाठी करण्यात आली आहे. या चित्रपटाचे नाव ‘2018: Everyone is a Hero’ असे आहे. या चित्रपटात टोव्हिनो थॉमसची मुख्य भूमिका आहे. हा मल्याळम चित्रपट २०२४ च्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत एंट्री आहे.
आज कन्नड चित्रपट दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांच्या नेतृत्वाखालील ज्युरीने ‘2018: एव्हरीवन इज ए हिरो’ चित्रपटाची निवड ऑस्करसाठी करण्यात आली आहे, अशी घोषणा केली. या चित्रपटाला नामांकन यादीत स्थान मिळाले तरच चित्रपट पुरस्कारासाठी पात्र ठरेल. ‘2018: एव्हरीवन इज अ हिरो’ हा चित्रपट केरळच्या काही भागात हाहाकार माजवणाऱ्या २०१८मध्ये आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.
ऑस्कर २०२४ साठी मल्याळम चित्रपट ‘2018’ ला निवडण्यापूर्वी, ‘द केरला स्टोरी’ (हिंदी), ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’, ‘मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे’ (हिंदी), ‘बालगम’ (तेलुगु), ‘वाळवी’ (मराठी), ‘बापल्योक’ (मराठी) आणि ‘१६ ऑगस्ट १९४७’ (तमिळ) या चित्रपटांबाबत विचार सुरू होता. अखेर ‘2018’ ने बाजी मारली आणि या चित्रपटाला भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात आलं आहे.