मातृत्वाची गोष्ट सांगणारी ‘यशोदा’चा उद्या IFFI मध्ये
पणजी (प्रतिनिधी) :
भारताच्या ५४ व्या आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवामध्ये गोवन स्टोरीज विभागात निवडलेल्या गेलेल्या ‘यशोदा’ या मातृत्वाची आगळी वेगळी गोष्ट सांगणाऱ्या लघुपटांचा प्रीमिअर २५ नोव्हेबर रोजी सकाळी ९.०० वाजता आयनॉक्स ऑडी ३ मध्ये होत आहे.
युवा पत्रकार रश्मी नरसे यांच्या ब्लु बे स्टुडिओची पहिलीच निर्मिती असलेल्या ‘यशोदा’ या लघुपटाने प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांमध्ये आपले कुतूहल कायम राखले आहे. प्रसिद्ध लेखिका आणि संगीतकार माधुरी अशीरगडे यांची कथा आणि संगीत या लघुपटाला लाभले आहे. या लघुपटातील प्रमुख भूमिकासह तंत्रज्ञामध्ये जवळपास ९० टक्के महिलाचा समावेश असून, अशाप्रकारचे वैशिष्ट्य असलेला हा पहिलाच गोमंतकीय लघुपट आहे. महिलाशक्तीच्या पडद्यामागील आणि पडद्यावरील या अनोख्या कारागिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या लघुपटात अभिनेत्री रावी किशोर आणि सोबिता कुडतरकर या प्रमुख भूमिकेत असून ज्येष्ठ पत्रकार किशोर नाईक गांवकर, तेजस कोळवेकर, प्रकाश नावलकर, चेतना नाईक, अंकिता सावंत, विजया दहिवाळ, श्रीपाद प्रभुदेसाई, माणिक आजगांवकर, आसावरी देशपांडे, प्रतिभा मेंढेकर, नेहा चोक्सी, बालकलाकार राधिका चोक्सी यांच्या महत्वाच्या भूमिका आहे. प्रवीण चौगुलेने दिग्दर्शित केलेल्या या लघुपटाला ज्येष्ठ गायिका साधना सरगम, प्रतिभा शहाणे यांनी स्वरसाज दिला आहे. तर सुनंदा काळुस्कर या लघुपटाच्या कार्यकारी निर्मात्या आहेत. रुपेश शेवाळेने छायाचित्रण केले आहे आणि विनोद राजेने संकलन केले आहे. कला विभाग संतोष लोखंडे यांनी सांभाळला आहे.
मातृत्वाची ओढ प्रत्येक स्त्रीला असते. यशोदाच्या माध्यमातून आम्ही याच मातृत्वाची महती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि प्रयत्न करताना या लघुपटाच्या संपूर्ण संचामध्ये अधिकाधिक महिलांना सामावून घेऊन त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि सिनेक्षेत्रातील महिला सबलीकरणाला मंच दिला असून, या लघुपटाच्या माध्यमातून गोमंतकीय सिनेजगतात आम्ही वेगवेगळे उपक्रम करत पुढे जाणार आहोत.
– रश्मी नर्से,
ब्लू बे स्टुडिओ.