‘गतीशक्ती’अंतर्गत राज्यात महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणणार : मुख्यमंत्री
डिचोली, राज्यात गुंतवणूक वाढावी, त्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘गतीशक्ती’अंतर्गत आणून रस्ते, विमानतळ, रेल आणि बंदरांना जोडण्याचा सरकारचा विचार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
डिचोलीतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या व्हाळशी ते वाठादेवपर्यंतच्या चौपदरी बगलमार्गाचे (बायपास) गुरुवारी (ता.६) लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. राज्य महामार्ग-१अंतर्गत येणाऱ्या या साडेचार किलोमीटर अंतराच्या बगलमार्गावर ७५ कोटींपेक्षा अधिक खर्च करण्यात आला आहे.
राज्याच्या हिताचे प्रकल्प आणण्यासाठी सरकार प्राधान्य देत आहे. रोजगार निर्मिती प्रकल्प आणण्यासाठी सरकारी जमिनी राखून ठेवा. सरकारी जमिनीवर अतिक्रमण करू नका किंवा त्या गीळंकृत करू नका, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
लोकार्पण सोहळ्यावेळी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्यासह माजी सभापती राजेश पाटणेकर, नगराध्यक्ष कुंदन फळारी, उपनगराध्यक्ष दीपा पळ, जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, मुख्याधिकारी सचिन देसाई, उपजिल्हाधिकारी रमेश गावकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य प्रधान अभियंता उत्तम पार्सेकर, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसह डिचोली पालिकेचे नगरसेवक तसेच विविध पंचायतींचे सरपंच, पंचसदस्य, भाजप कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फीत कापून आणि नामफलकाचे अनावरण करून बगलमार्गाचे लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्यावेळी बगलमार्ग वेळेत पूर्ण करण्यासाठी योगदान दिलेल्या मान्यवरांना यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन गोविंद भगत यांनी केले.