‘गोव्यातील ऐतिहासिक क्षेत्रांचा प्रचार व्हावा’
पणजी:
विद्यार्थ्यांनी इतिहासाचा अभ्यास करून सत्य लोकांसमोर आणण्याची गरज आहे. इतिहास हा वाहत्या पाण्यासारखा असतो. राज्यात अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत, त्या ऐतिहासिक ठिकाणांचा प्रचार केला जावा, असे मत राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी व्यक्त केला.
मिरामार रेसिडेन्सीमागील साठाव्या पुण्यतिथीनिमित्त लेफ्टनंट गव्हर्नर मुल्क राज सचदेव यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून त्यांनी आदरांजली वाहिली. याप्रसंगी पर्यटन मंत्री रोहन खंवटे, राज्यपालांचे सचिव एम. आर.एम. राव (आयएएस), मिहीर वर्धन व संजीव सरदेसाई, माजी महापौर तथा नगरसेवक उदय मडकईकर यांची उपस्थिती होती.
पिल्लई यांनी औपचारिक स्तुतीपर भाषणात गोव्यातील ऐतिहासिक क्षेत्रांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. राम मनोहर लोहिया यांच्या कार्याचा त्यांनी पुनरुच्चार केला आणि गोवा मुक्तीसाठी त्यांनी सर्व काही केल्याचे नमूद केले. पुष्पहार अर्पण केल्यानंतर सरदेसाई यांनी सचदेव यांच्या जीवनशैली व कार्यावर प्रकाश टाकला.गोवा, दमण आणि दीवचे लेफ्टनंट गव्हर्नर हे राज्याचे एकमेव पहिले नागरिक असल्याचे त्यांनी सांगितले. गोवा राज्य पर्यटन विकास महामंडळाचे दीपक नार्वेकर यांनी आभार मानले.