
ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे निधन
मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध हास्य अभिनेता सतीश शाह यांचं वयाच्या 74 व्या वर्षी निधन झालं. सतीश शाह यांनी शनिवारी दुपारी 2:30 वाजता मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सतीश शाह यांनी अनेक चित्रपटात केलेल्या विनोदी भूमिका गाजल्या. किडनी विकारामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांनी ‘जाने भी दो यारो’, ‘साराभाई विरुद्ध साराभाई’, ‘मैं हूं ना’ आणि ‘ओम शांती ओम’ या सारख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला. त्यांचे शनिवारी वयाच्या 74 व्या वर्षी मुंबईत निधन झालं. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी सोशल माध्यमात पोस्ट शेयर करत दिवंगत अभिनेते सतीष शाह यांचा फोटो शेअर केला. त्यांनी त्यांच्या मृत्यूचं कारण स्पष्ट करणारा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
या व्हिडिओत त्यांनी, ‘मी तुमच्यासोबत एक दुःखद बातमी शेअर करू इच्छितो, आमचे मित्र, महान अभिनेते, सतीश शाह यांचं मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे निधन झालं आहे. काही काळापूर्वी ते घरी अचानक आजारी पडले, त्यांना शिवाजी पार्क इथल्या हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचार सुरू असताना त्यांचं निधन झालं आहे. त्यांचं पार्थिव वांद्रे इथल्या त्यांच्या निवासस्थानी आणलं जाणार आहे’.
सतीश शाह यांचे सहकलाकार जॉनी लिवर यांनी सतीश शाह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. याबाबत जॉनी लिवर यांनी सोशल माध्यमात पोस्ट शेयर केली. या पोस्टमध्ये त्यांनी, “आपण एका महान कलाकाराला आणि ४० वर्षांहून अधिक काळापासूनच्या माझ्या सर्वात जवळच्या मित्राला गमावल्याचं सांगताना खूप दुःख होत आहे. विश्वास बसत नाहीये – दोन दिवसांपूर्वीच मी त्यांच्याशी बोललो होतो. सतीश भाई, तुमची खरोखरच आठवण येईल. चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील तुमचं मोठं योगदान कधीही विसरलं जाणार नाही,” असं नमूद करुन शोक व्यक्त केला आहे.


