पुलित्झर पुरस्कारांवर ‘असोसिएट प्रेस’चा ठसा
यंदाच्या पुलित्झर पत्रकारिता पुरस्कारात ‘असोसिएटेड प्रेस’ (एपी) या वृत्तसंस्थेने आपला ठसा उमटवला आहे. एपीला मानाच्या ‘सार्वजनिक सेवा पुरस्कारा’सह दोन पुलित्झर पुरस्कार मिळाले. युक्रेन युद्धाच्या वृत्तांकनासाठी एपीला सार्वजनिक सेवेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला.याशिवाय द न्यूयॉर्क टाईम्सला रशियाच्या घुसखोरीवरील वृत्तांकनासाठी आंतरराष्ट्रीय वार्ताकनाचा पुलित्झर पुरस्कार मिळाला.
वॉशिंग्टन पोस्टचे वार्ताहर कॅरोलिन किचनर यांना त्यांनी मागील वर्षी अमेरिकेत सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताबाबत दिलेल्या निकालावर केलेल्या वार्ताकनासाठी राष्ट्रीय वार्ताकनाचा पुलित्झर पुरस्कार मिळाला. सध्या न्यूयॉर्क टाईम्समध्ये काम करत असलेल्या ईली सस्लोव यांना त्यांनी वॉशिंग्टन पोस्टमध्ये केलेल्या कामासाठी फिचर लेखनाचा पुलित्झर पुरस्कार मिळाला.
यंदा रॉयटर्स वृत्तसंस्थेचा पुलित्झर पुरस्काराच्या दोन श्रेण्यांमध्ये अंतिम फेरीत समावेश झाला आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तांकनासाठी पुलित्झर पुरस्कार समितीने रॉयटर्सचा विशेष उल्लेख केला. यात त्यांच्या नायजेरियातील मानवाधिकारांच्या उल्लंघनावर केलेल्या चार भागातील शोध पत्रकारितेचा समावेश आहे. राष्ट्रीय वृत्तांकनामध्येही रॉयटर्सच्या बालकामगाराबाबतच्या वृत्ताकनाचा अंतिम फेरीत समावेश झाला.
दरम्यान, या पुरस्काराची सुरुवात १९१७ मध्ये झाली. हा पत्रकारितेतील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. जोसेफ पुलित्झर यांचा १९११ मध्ये मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नावाने या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली.