
डिजिटल बँकिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आर्थिक समावेशनावर BOB चा भर
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक बँक ऑफ बडोदाने सोमवारी आपला ११९ वा स्थापना दिन ‘विश्वासाच्या बळावर नेतृत्व’ (Leading with Trust) या संकल्पनेखाली साजरा करत डिजिटल बँकिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रिटेल बँकिंग, एमएसएमई, हरित वित्तपुरवठा आणि आर्थिक समावेशनाशी संबंधित विविध नव्या उपक्रमांची घोषणा केली.
या कार्यक्रमात बँकेचे जागतिक ब्रँड अॅम्बेसेडर सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते नव्या bob World मोबाईल बँकिंग अॅपचे अनावरण करण्यात आले. तसेच AAROHAN GCIC (Global Capability, Innovation & Transformation Centre) आणि ADITI 2.0 या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित व्हर्च्युअल बँकिंग प्लॅटफॉर्मचे उद्घाटनही करण्यात आले. ग्राहकांना अधिक वेगवान, सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित सेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे बँकेने सांगितले.
याशिवाय bob Elev8 Home Loan, bob Green PLUG आणि bob Agniveer MSME Scheme यांसारख्या ग्राहकाभिमुख योजनांचीही सुरुवात करण्यात आली. गृहकर्ज, हरित वित्तपुरवठा आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) चालना देण्याच्या उद्देशाने या योजना राबविण्यात येणार आहेत.
आर्थिक समावेशनाला अधिक बळ देण्यासाठी बँकेने देशभरात ११९ नवीन बिझनेस करस्पाँडंट (BC) केंद्रांचे उद्घाटन केले. या केंद्रांमुळे ग्रामीण तसेच बँकिंग सुविधांपासून वंचित भागांतील नागरिकांना बँकिंग सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध होणार असल्याचे बँकेने स्पष्ट केले.
यावेळी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. देबदत्ता चंद म्हणाले, “‘विश्वासाच्या बळावर नेतृत्व’ ही संकल्पना बँकेच्या प्रामाणिकपणा, नावीन्य आणि ग्राहकांचा विश्वास जपण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. भविष्यातही विश्वास हाच आमच्या विकासाचा आणि ग्राहकांशी असलेल्या नात्याचा मजबूत पाया राहील.”
स्थापना दिनानिमित्त जाहीर करण्यात आलेल्या या नव्या उपक्रमांमधून बँक ऑफ बडोदाने डिजिटल परिवर्तन, ग्राहककेंद्रित सेवा आणि आर्थिक समावेशनाला अधिक गती देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.






