महाराष्ट्रात निमलष्करी दल होणार सज्ज?
नवी दिल्ली :
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील महाबंडखोरीनंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची निदर्शने, तोडफोड आणि जाळपोळीचे प्रकार पाहता मुंबईसह राज्यात निमलष्करी दलांना पाचारण करावे, या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्ररुपी मागणीला केंद्रीय गृहमंत्रालय सकारात्मक प्रतिसाद देण्याच्या मानसिकतेत आहे.
बंडखोर आमदार मुंबईत परत येतील त्याच सुमारास महाराष्ट्रात निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्याच्या दृष्टीने गृहमंत्रालयाच्या पातळीवर हालचाली सुरू झाल्याचे समजते. गुवाहाटीमध्ये पंचतारांकित हॉटेलात मुक्कामी थांबलेल्या सुमारे ५० बंडखोर आमदारांनाही राज्यात,आपापल्या मतदारसंघात परतण्याचे वेध लागले आहेत. अनेक आमदारांनी तशी मागणी शिंदे यांच्याकडे केली आहे.
मात्र शिवसेना कार्यकर्त्यांच्या संतप्त आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर या आमदारांचा जीव धोक्यात येईल, असे पाऊल उचलण्यास भाजपचे सर्वेसर्वा नेतृत्व सध्या तयार नाही. दुसरीकडे यासंदर्भातील लढाई सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्याने न्यायालयीन सुनावणीची कारवाईही सुरू झाली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी काल रुग्णालयातून परतल्यावर राज्यातील कायदा-सुव्यवस्था परिस्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त करणारे आणखी एक पत्र केंद्रीय गृहसचिवांना लिहिले.
राज्यपाल कोश्यारी यांच्या पत्राची केंद्रीय गृहसचिव अजयकुमार भल्ला यांच्या पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली आहे. बंडखोर आमदारांविरुद्ध आक्रमक झालेले शिवसेनेचे कार्यकर्ते अनेक शहरांमध्ये तोडफोड करत आहेत व महाराष्ट्राचे पोलिस मूकदर्शक बनले आहे, असा गंभीर आरोप राज्यपालांनी केला आहे. त्यामुळेच हे आमदार जेव्हा प्रत्यक्ष मुंबईत परत येतील त्यावेळी त्यांच्या जीविताचे रक्षण व कायदा सुव्यवस्था परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, या दृष्टीने निमलष्करी दले मुंबई आणि राज्यात तैनात करण्याच्या दृष्टीनेही हालचाली सुरू झाल्या आहेत. साधारणतः या आठवडाभरात याबाबत केंद्राकडून ठोस निर्णय गृहमंत्रालयाकडून प्रत्यक्ष अमलातही आणला जाणे शक्य आहे.