
‘का’ नाकारली मराठा आंदोलनाला आझाद मैदानात परवानगी ?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येनं मोर्चेकरी राजधानी मुंबईच्या दिशेनं मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली कूच करत आहेत. मनोज जरांगे-पाटील २६ जानेवारीपासून आझाद मैदान आंदोलन करणार आहेत. पण, आझाद मैदानात आंदोलन करण्यास मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आंदोलनासाठी पोलिसांनी खारघर येथील मैदान सुचवलं आहे.
लाखोंच्या संख्येनं मोर्चेकरी वाहनांसह मुंबईत येणार आहेत. त्यामुळे मुंबईत दैनंदिन जनजीनव विस्कळीत होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याच पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर मनोज जरांगे-पाटील यांना आंदोलन करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. नवी मुंबईमधील खारगर येथील सेंट्रल पार्कमधील आंतरराष्ट्रीय मैदानाचा पर्याय पोलिसांनी आयोजकांना सुचवला आहे.
“आझाद मैदानावर व्यासपीठ उभे राहिलं आहे,” अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे-पाटील यांनी दिली आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी कुठलाही संवाद झाला नाही. आम्हाला तोडगा काढायचा आहे. मज्जा करण्यासाठी मुंबईला आलो नाही. जेवढे मुंबईचे हाल होणार आहेत, तेवढं आमचेही हाल होत आहेत. दोघांचेही हाल होऊ द्यायचे नाही, हे सरकारच्या हातात आहे,” असं जरांगे-पाटलांनी म्हटलं.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: चर्चेस यावं, ही माझी विनंती आहे. आम्हाला मुंबईला येण्याची हौस नाही. अन्यथा आम्ही मुंबईकडे निघालो आहे. तिघांनी तोडगा काढावा,” असं मनोज जरांगे-पाटील म्हणाले.