पणजी :
केंब्रिज विद्यापीठात व्याख्यान देणे हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासाठी पूर्णपणे त्यांच्या अभ्यासक्रमाबाहेरचे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच राहुल गांधीच्या आजी व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचे वडील व माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची दहशतवाद्यांनी हत्या केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा दहशतवादाशी संबंध आहे.
ज्यांना दहशतवादाचे संकट झेलावे लागले तेच त्याची वेदना समजू शकतात. मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विनंती करतो की, ऐतिहासिक भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या दिवशी श्रीनगर-काश्मीरमध्ये राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांचे भाषण त्यानी पाहावे. हात से हाथ जोडो मोहिमेने भाजपला पुन्हा एकदा धडकी भरल्याचे दिसते, असा सणसणीत टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हाणला आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंब्रिज विद्यापीठातील भाषणानंतर राहुल गांधींच्या भूमिकेवर प्रश्न विचारत केलेल्या ट्विटच्या मालिकेला उत्तर देताना विरोधी पक्षनेत्यांनी दोन ट्विट केले. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येनंतरचे अनुभव कथन करणाऱ्या राहुल गांधींच्या श्रीनगर येथील भाषणाची व्हिडिओची लिंकही त्यांनी शेअर केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी आणि त्यांच्या भाषणाची दिशाभूल करणारे सहा ट्विट पोस्ट करण्यास प्राधान्य दिले हे सर्वात दुर्दैवी आहे. राहुल गांधी यांनी यात्रेदरम्यान पुलवामा शहीदांना श्रद्धांजली वाहिली आणि भारतीय हद्दीत चीनच्या आक्रमणाविरोधात सरकारकडे कारवाई करण्याची जोरदार मागणी केली ही वस्तुस्थिती आहे असे युरी आलेमाव यांनी नमूद केले.
राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी दहशतवाद संपुष्टात आणण्याबाबत स्पष्टपणे भाष्य केले आहे. त्यांनी आपल्या प्रियजनांच्या निर्दयी हत्येची बातमी देण्यासाठी येणारे फोन कॉल घेणाऱ्या कुटुंबांची अग्निपरीक्षेच्या अनुभवांचे कथन केले आहे आणि प्रत्येकाने अशा सर्व कॉल्सना कायम पूर्णविराम देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेसने नेहमीच दहशतवादाच्या विरोधात लढा दिला आहे असे युरी आलेमाव म्हणाले.