देशाला आज मिळणार नवे राष्ट्रपती
नवी दिल्ली:
आज 21 जुलै 2022 रोजी देशाला 15 वे राष्ट्रपती मिळणार आहेत. 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान झाल्यानंतर गुरुवारी 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता संसद भवनामध्ये मतमोजणी सुरू होणार आहे. एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) या निवडणुकीत विजयी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जिंकल्या तर त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती बनणार आहेत.
15 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 21 जुलै रोजी भारताला पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या. 15 वर्षांपूर्वी 21 जुलै रोजी प्रतिभा देवीसिंह पाटील (Pratibha Patil) यांच्या रूपाने देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या.
21 जुलै 2007 रोजी झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या मतमोजणीत प्रतिभा देवीसिंह पाटील विजयी झाल्या आणि त्यानंतर 25 जुलै 2007 रोजी त्यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती.
देशातील हे सर्वोच्च घटनात्मक पद भूषवणाऱ्या प्रतिभा पाटील या पहिल्या महिला होत्या. त्यानंतर आता एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या निवडणुकीत विजयी झाल्या तर त्या आणि देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती बनतील तसेच पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती देखील बनतील.
सध्या देशाचे विद्यमान राष्ट्रपती राम नाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार असून नवे राष्ट्रपती 25 जुलै रोजी शपथ घेणार आहेत.