
दिग्विजय सिंह यांच्याकडून भाजपा, RSS चे कौतुक!
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांनी केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांना पक्षामध्ये काही सुधारणांची गरज असल्याबद्दल त्यांनी एक पत्र लिहिले होते. त्यानंतर अवघ्या आठवडाभरातच दिग्विजय सिंह यांची ही पोस्ट समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ९० च्या दशकातील एक ‘ब्लॅक अँड व्हाईट’ फोटो शेअर करत त्यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) कौतुक केले आहे. काँग्रेस पक्ष हा नेहमीच विविध मुद्द्यांवरून भाजपा आणि आरएसएसवर टीका करत असतो, अशा परिस्थितीत सिंह यांनी केलेले हे कौतुक चर्चेचा विषय ठरले आहे.
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री सिंह यांनी सोशल मीडियावर कोरा (Quora) चा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या फोटोमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी गुजरातमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसत आहेत, तर तरुण नरेंद्र मोदी अडवाणी यांच्या जवळ जमिनीवर बसलेले दिसत आहेत. पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख कर काँग्रेस नेते सिंह यांनी भाजपा आणि आरएसएचे कौतुक केले आहे. कशा प्रकारे कधीकाळी जमिनीवर बसणारा सामान्य कार्यकर्ता संघ-भाजपा व्यवस्थेमध्ये वरपर्यंत पोहचू शकतो आणि मुख्यमंत्री आणि पंतप्रधान बनू शकतो याचे त्यांनी कौतुक केले आहे.
“मला कोरा साईटवर हा फोटो मिळाला. अत्यंत प्रभावशाली आहे. कशा प्रकारे आरएसएसचा सामान्य स्वयंसेवक व जनसंघ भाजपाचा कार्यकर्ता नेत्यांच्या पायाजवळ जमिनीवर बसून राज्याचा मुख्यमंत्री व देशाचा पंतप्रधान बनला. हीच संघटनेची शक्ती आहे. जय सिया राम,” असे दिग्विजय सिंह म्हणाले आहेत.
दरम्यान दिग्विजय सिंह यांच्या या पोस्टनंतर वादाला तोंड फुटल्यानंतर त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले की त्यांनी फक्त संघटनेचे कौतुक केले, पण भाजपा आणि आरएसएसला विरोध करत राहतील.
दिग्विजय सिंह यांनी शेअर केलेला हा फोटो १९९० च्या दशकातील आहे. १९९६ साली गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान हा फोटो काढण्यात आल्याचे सांगितले जाते. या सोहळ्याला त्यावेळचे भाजपाचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.”




