मडगावकराना सुरक्षा द्या : प्रभव नायक
मडगावकरांची सुरक्षा सुनिश्चित करणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. मडगावचो आवाजने दक्षिण गोवा पोलिस अधिक्षक सुनिता सावंत यांना निवेदन सादर करुन चोरी, गुन्हे आणि समाजकंटकांनी निर्माण केलेले उपद्रव रोखण्यासाठी त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आणि नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान रहदारीचे नियमन करणे आणि जीवघेणे अपघात टाळण्यासाठी दारू पिऊन गाडी चालवणे यावर अंकुश ठेवण्यासाठी अतिरिक्त फौजफाट तैनात करण्याची मागणी केली आहे असे युवा नेते प्रभव नायक यांनी म्हटले आहे.
आज पोलिस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनात प्रभव नायक यांनी, मडगाव येथील चोरी, दरोडे व गुन्ह्यांच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाल्याने नागरिकांच्या मनात भीती व चिंता असल्याचे म्हटले आहे. चोरी आणि घरफोडींच्या घटनात मागील पंधरवडा झालेली वाढ हा सुरक्षेच्या संदर्भात अत्यंत चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
चोरींच्या घटनांचे जे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत त्यातून कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेचे अपयश उघड केले आहे. चोरांना पोलिसांची भीती नसल्यानेच रहदारी सुरू असलेल्या प्रमूख रस्त्यांवर दुकाने फोडण्याचे धाडस चोर करीत आहेत. पहाटेच्या वेळेत सतत वाहनांची वर्दळ सुरू असताना मडगाव शहरातील मुख्य रस्त्यांवरील आस्थापनें फोडली यावरून पोलीस खाते रात्रीच्यावेळी गस्त घालण्यात तसेच महत्त्वाच्या जंक्शन्सवर नाकाबंदी करण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे उघड होत असल्याचे प्रभव नायक यांनी निवेदनात नमूद केले आहे.
पोलिस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनात न्यू मार्केट ट्रेडर्स असोसिएशनने कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर उपस्थित केलेल्या प्रश्नाचाही संदर्भ मडगावचो आवाजने दिला असून, रात्री उशीरा पर्यंत चालू असलेल्या बार आणि तावेर्न सारख्या काही आस्थापनांवर कारवाई होत नसल्याचे सांगून त्यावर पोलीस अधीक्षकांचे लक्ष वेधले आहे. शहरात वाढलेल्या जुगाराच्या अड्ड्यांवर कारवाई करण्याची मागणी सदर निवेदनातून मडगावचो आवाजचे प्रभव नायक यांनी केली आहे.
नशेत असलेल्या समाजकंटकांकडून रात्री-अपरात्री लोकांची झोपमोड करण्यात येते तसेच मारामारी आणि अंमली पदार्थांचे सेवन व विक्री वाढत असल्याचे प्रभव नायक यांनी निवेदनात नमूद केले आहे.
शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच घरात एकटेच राहत असलेल्या ज्येष्ट नागरीकांना सुरक्षा देण्यासाठी पोलिस यंत्रणेने जबाबदारीने पाऊले उचलावीत अशी मागणी प्रभव नायक यांनी केली आहे.
नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येला तसेच नवीन वर्षाच्या सुरूवातीला लोक धार्मिक स्थळे वा मनोरंजनांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. नेमकी हिच संधी साधून चोर आपला डाव साधण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी गस्त वाढविणे महत्वाचे असल्याचे प्रभव नायक यांनी म्हटले आहे.
नववर्ष स्वागतासाठी चर्च व कपेलात आयोजित प्रार्थनासभेवेळी उपस्थित राहणाऱ्यांची गैरसोय होवू नये म्हणून रहदारीचे नियमन करावे तसेच जीवघेणे अपघात टाळण्यासाठी दारू पिऊन वाहने चालविण्यावर आळाबंद घालावा अशी मागणी मडगावचो आवाजचे प्रभव नायक यांनी निवेदनात केली आहे.