‘जळलेल्या वनक्षेत्रात भूरूपांतर होणार नाही’
म्हादई अभयारण्यासह राज्यातील अनेक जंगलांमध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यात लावण्यात आलेल्या आगींमध्ये 480 हेक्टर वनक्षेत्र बेचिराख झाले आहे. यातील 365 हेक्टर क्षेत्र अभयारण्य राखीव क्षेत्र आणि नॅशनल पार्कचा भाग असल्याची माहिती वनमंत्री विश्वजीत राणे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तर तासाला दिली.
त्या भागांत कदापि भूरूपांतर होणार नाही. तेथे कोणतीही ‘बिल्डर लॉबी’ सक्रिय होईल हा कयास अनाठायी आहे. तसे निदर्शनास आणून दिल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही वनमंत्री म्हणाले.
या विषयावरून आज विधानसभेत विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला. विधानसभा अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासाला आमदार कार्लुस फेरेरा यांनी म्हादई अभयारण्यात लागलेल्या आगीचा प्रश्न उपस्थित केला होता.
यावर मंत्री राणे म्हणाले, “प्रत्यक्ष स्थिती समजून घेतली पाहिजे. मोर्लेसारख्या ठिकाणी अतिशय घनदाट डोंगरमाथ्यावर आग लागल्यास तिथे बंब पोहोचवणे कठीण होते. त्यामुळे वायुदल दल, नौदलाची मदत घेतली.”
“तसेच अन्य ठिकाणी आग लागल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जी यंत्रणा लागणार आहे, त्याचा आराखडा बनवला जात आहे. या संबंधीचा सविस्तर अहवाल तयार केला असून, आगीमध्ये नक्की किती क्षेत्र भक्ष्यस्थानी पडले? कोणत्या प्रकारची जैवविविधता नष्ट झाली याचा उल्लेख आहे. तो आपण लवकरच विधानसभेत सादर करू,” असेही मंत्री राणे म्हणाले.
विरोधकांचे प्रश्न
यंदा जो प्रकार घडला, तो पुढे घडू नये यासाठी वन खात्याने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत? डोंगरमाथ्यावर अग्निशमन बंब पोहोचत नाहीत, त्यासाठी काय तोडगा काढला? आग लागण्याची संभाव्य स्थळे निश्चित केली आहेत का? जे क्षेत्र आगीत भस्म झाले, त्याचे भूखंड पाडून बिल्डर लॉबीला दिले जाऊ नयेत, याची काळजी घेणार का?