
चित्रपट निर्मिती अनुदानातील ‘ब’ श्रेणीतील चित्रपटांसाठी ३० लाख आणि ‘क’ श्रेणीतील चित्रपटांना १० लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. आत्तापर्यंत निर्माण झालेल्या कोकणी चित्रपटांचे संवर्धन केले जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा राज्य चित्रपट महोत्सवाचा समारोप समारंभात सांगितले.
गोव्याच्या सांस्कृतिक आणि कलात्मक जीवनातील एक महत्त्वाचा भाग असलेल्या गोवा चित्रपट महोत्सव 2025 चा नुकताच भव्य सोहळ्यात समारोप झाला. या महोत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांना प्रदान करण्यात आलेला जीवनगौरव पुरस्कार.
कोकणीतून चित्रपट निर्मितीसाठी पुढे या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. राज्यात इफ्फी, मराठी चित्रपट महोत्सव आणि राज्य चित्रपट महोत्सव होतो, ही अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या चित्रपट महोत्सवाने गोव्यातील आणि कोकणी चित्रपटसृष्टीतील प्रतिभेला एक मोठे व्यासपीठ दिले. या पुरस्कारांनी हे सिद्ध झाले की, स्थानिक चित्रपट केवळ कथा सांगण्यापुरते मर्यादित नसून, तंत्रज्ञानाच्या बाबतीतही जागतिक दर्जाची कामगिरी करत आहेत, ज्यामुळे भविष्यात गोव्याच्या चित्रपट निर्मितीला अधिक प्रोत्साहन मिळेल.