
‘सिनेमा, कलेसाठी सरकारचे सातत्याने योगदान!’
राज्य चित्रपट महोत्सवाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उत्साहात उद्घाटन
पणजी: गोव्यात सिनेमा आणि सादरीकरण कलेसाठी सरकारचे सातत्यपूर्ण योगदान आहे, असे विधान गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गोवा राज्य चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
शाळेत शिकवले जाणारे सादरीकरण कलासंबंधी विषय, नाट्य महाविद्यालय, गोव्यात होणारे वेगवेगळे चित्रपट महोत्सव, त्या अनुषंगाने होणाऱ्या कार्यशाळा यातून गोव्यातील चित्रपट कलाकारांसाठी पोषक असलेली वातावरण निर्मिती होते, असे ते पुढे म्हणाले. गेली अनेक वर्षे रखडून असलेल्या चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन १०वा ११वा आणि १२वा अशा तीन चित्रपट महोत्सवाचे एकत्रित करून पणजी येथील आयनॉक्स सिनेमागृहात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
४८ तासांत लघु चित्रपट तयार करण्याच्या स्पर्धेचा निकाल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घोषित केला. या स्पर्धेचे विजेते पुढील प्रमाणे, उत्कृष्ट चित्रपट पहिले बक्षीस – फूल आनी सावली (फ्लॉवर अँड शेड), द्वितीय बक्षीस – बिफोर सनराईज. उत्कृष्ट दिग्दर्शक – ग्लेन कार्दोज (फूल आनी सावली). उत्कृष्ट सिनेमेटोग्राफर – तेजस व्ही. नाईक (फूल आनी सावली). उत्कृष्ट संपादक – युरी बी. कार्व्हाल्हो (फूल आनी सावली). उत्कृष्ट अभिनेता – नीरज ॲरी (लिफ्ट). उत्कृष्ट अभिनेत्री – रती भाटीकर (फूल आनी सावली)