इफ्फीत झाला भारताचा पहिला AI चित्रपट महोत्सव
वेव्हज् फिल्म बाजार आणि इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) यांनी एलटीआय माईंडट्रीच्या सहकार्याने, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) च्या या 56 व्या आवृत्तीत, गोव्यात पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता(एआय) चित्रपट महोत्सव आणि सिनेमा एआय हॅकाथॉन सुरू केला. हा अग्रणी उपक्रम सिनेमातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भारताकडून होणाऱ्या शोधात एक महत्त्वपूर्ण पाऊल दर्शवतो, जो सर्जनशील अभिव्यक्तीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जोडतो.
या महोत्सवासाठी 18 देशांचे प्रतिनिधित्व करणारे 68 वैविध्यपूर्ण आणि प्रभावी चित्रपट प्राप्त झाले, यात 5 आंतरराष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता चित्रपट महोत्सवांचे पुरस्कार विजेते फिल्म पॅकेज (ऍडोब मॅक्स, अमेरिकेचा एआय फिल्म3 महोत्सव, इटलीचा बुरानो एआय फिल्म फेस्टिव्हल, यूके चा मेटामॉर्फ एआय फिल्म ऍवॉर्ड्स, ऑस्ट्रेलियाचा ओम्नी फिल्म फेस्टिव्हल) आणि जगभरातील 14 वैयक्तिक चित्रपट निर्मात्यांचा समावेश होता.
या मोठ्या सहभागामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने कथाकथन (AI-assisted storytelling) किती वेगाने वाढत आहे आणि पुढील पिढीतील सिनेमॅटिक साधनांसह प्रयोग करणाऱ्या निर्मात्यांच्या समुदायाचा विस्तार होत आहे, हे अधोरेखित होते. या प्रवेशिकांमधून, महोत्सवाने त्यांच्या कलात्मक गुणवत्तेसाठी, तांत्रिक नवकल्पनांसाठी आणि कथनाच्या खोलीसाठी 27 चित्रपटांची स्पर्धा श्रेणीसाठी आणि 4 चित्रपटांची गैर-स्पर्धा प्रदर्शनासाठी निवड केली.
कृत्रिम बुद्धिमत्ता चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धा पुरस्कारांचे विजेते वेव्हज् फिल्म बाजारच्या समारोप सोहळ्यात जाहीर झाले.
कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चित्रपट निर्मितीतील उत्कृष्टतेला गौरवण्यासाठी ‘द क्राफ्ट’ने खालील चित्रपट प्रकल्पांना हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले:
- द क्राफ्ट मास्टर पुरस्कार – सर्वोत्कृष्ट कृत्रिम बुद्धिमत्ता लघुपट (₹3,00,000) हा पुरस्कार फ्रान्सच्या गुईलॉम हर्बॉल्ट (Guillaume Hurbault) दिग्दर्शित ‘नागोरी’ या इंग्रजी भाषेतील चित्रपटाला प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट कथाकथन, सादरीकरण आणि भावनिक अनुनाद यासाठी ओळख मिळवत, हा चित्रपट सर्वात उत्कृष्ट कृत्रिम बुद्धिमत्ता-निर्मित लघुपट म्हणून उठून दिसतो.
- द क्राफ्ट व्हॅनगार्ड पुरस्कार – कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्वात नाविन्यपूर्ण वापर / प्रायोगिक कथन (₹2,00,000) हा पुरस्कार जर्मनीच्या मार्क वाचहोल्झ दिग्दर्शित ‘द सिनेमा दॅट नेव्हर वॉज’ या इंग्रजी भाषेतील चित्रपटाला प्रदान करण्यात आला. या चित्रपटाचा गौरव त्याची धाडसी प्रयोगशीलता, अपारंपरिक कथा रचना आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या अग्रगण्य वापरासाठी करण्यात आला.
- द क्राफ्ट स्पेक्ट्रा पुरस्कार – सर्वोत्कृष्ट कृत्रिम बुद्धिमत्ता ॲनिमेशन / दृश्य रचना (₹1,00,000) हा पुरस्कार USA च्या ‘मेटा पपेट’ (Meta Puppet) दिग्दर्शित ‘कायरा’ या इंग्रजी भाषेतील चित्रपटाला प्रदान करण्यात आला. कृत्रिम बुद्धिमत्ता साधने आणि तंत्रांद्वारे साध्य केलेल्या त्याच्या अपवादात्मक दृश्यात्मक कलात्मकता, रचनांमधील नवकल्पना आणि सौंदर्यविषयक कामगिरीसाठी तो ओळखला जातो.
- ज्युरी स्पेशल मेन्शन हा पुरस्कार श्रीरितन्या एम. यांच्या ‘द लास्ट बॅकअप फायनल पार्ट’ या इंग्रजी भाषेतील चित्रपटाला आणि शिवांशू निरूपम यांच्या हिंदी चित्रपट ‘मिरॅकल ऑन कछुआ बीच’ ला प्रदान करण्यात आला. या चित्रपटांनी कृत्रिम बुद्धिमत्ता चित्रपट निर्मितीमध्ये असाधारण क्षमता प्रदर्शित केली आहे.






