
पंतप्रधानांबद्दलचं ‘ते’ वक्तव्य अधीर रंजन चौधरी यांना भोवलं…
संसदीय कामकाजात व्यत्यय आणल्याच्या आणि देशाची बदनामी केल्याच्या आरोपाखाली काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आलं आहे. विशेषाधिकार समिती त्यांच्या विरोधात अहवाल सादर करेपर्यंत अधीर रंजन चौधरी यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आलं आहे. हे प्रकरण आता विशेषाधिकार समितीकडे सोपवण्यात आलं आहे. विशेषाधिकार समिती याप्रकरणी निर्णय घेईपर्यंत चौधरी निलंबित असतील. भाजप नेते आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी अधीर रंजन यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सभागृहात मांडला होता, जो संसदेत मान्य करण्यात आला.
प्रल्हाद जोशी यांनी अधीर रंजन चौधरी यांच्यावर संसदीय कामकाजात सतत व्यत्यय आणल्याचा आणि देशाची बदनामी केल्याचा आरोप केला होता. सभापतींनी अनेकदा इशारा देऊनही चौधरी यांचं वागणं बदललं नाही असंही जोशी यांनी म्हटलं आहे. तसेच याप्रकरणी त्यांनी माफीदेखील मागितली नसल्याचं जोशी यांनी म्हटलं आहे.
ज्या वक्तव्यामुळे अधीर रंजन चौधरी यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली, तेच वक्तव्य कावाईनंतर चौधरी यांनी पुन्हा केलं. तसेच चौधरी म्हणाले, पंतप्रधानांचा अनादर करणं हा माझा उद्देश नव्हता. मी केवळ धृतराष्ट्र आणि द्रौपदीचं उदाहरण दिलं होतं. भाजपाचा एक धिप्पाड खासदार माझ्यावर हल्ला करण्यासाठी आला तेव्हा मी कुठलीही तक्रार केली नव्हती. ते सध्या बहुमताचं राजकारण करत आहेत. मी कुठलाही चुकीचा शब्द उच्चारला नव्हता. तुम्ही कुठल्याही घटनातज्ज्ञाला जाऊन विचारा.
अधीर रंजन चौधरी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल म्हणाले होते की, धृतराष्ट्र आंधळा होता, तेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं. आजही राजा आंधळाच आहे. मणिपूर आणि हस्तिनापूरमध्ये कसलाच फरक नाही. नरेंद्र मोदी नीरव मोदीसारखे शांत बसले आहेत. भाजपाने मणिपूरच्या खासदाराला संसदेत बोलण्याची संधीदेखील दिली नाही.