
आयटीई अँड सी मंत्र्यांनी घेतली ईएमसी तुये येथे भागधारकांची भेट
तुये:
गोवा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स खात्याच्या तुये येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (ईएमसी) कार्यान्वित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, गोवा सरकारचे माननीय माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स मंत्री श्री. रोहन अ. खंवटे यांनी विकासाच्या या पुढच्या टप्प्याला पाठिंबा देऊन तो सुलभ करण्यासाठी भूखंड वाटपधारक, भागधारक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष आढावा घेतला.
माननीय मंत्री श्री. रोहन अ. खंवटे यांनी तुये येथील ईएमसीच्या प्रशासकीय इमारतीत बैठक घेतली. यावेळी माननीय आमदार आणि इन्फोटेक कॉर्पोरेशन ऑफ गोवा लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत शेट्ये; डीआयटीई अँड सीचे संचालक श्री. कबीर शिरगावकर; इन्फोटेक कॉर्पोरेशन ऑफ गोवा लिमिटेडचे (आयटीजी) व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रवीण वळवटकर आणि गोवा माहिती तंत्रज्ञान विकास महामंडळाचे
(जीआयटीडीसी) मुख्य अभियंता आणि इन्फोटेक कॉर्पोरेशन ऑफ गोवा लिमिटेडचे (आयटीजी) श्री. सुब्राई नाडकर्णी उपस्थित होते.
या भेटीदरम्यान, माननीय मंत्र्यांनी प्रत्येक भूखंडधारकांशी त्यांच्या विकास योजनांविषयी माहिती मिळवण्यासाठी आणि वेळेवर प्रगती सुलभ करण्यासाठी खात्याच्या पाठिंब्याची पुष्टी करण्यास चर्चा केली. या चर्चेत वीज आणि पाणी जोडणीशी संबंधित प्रक्रिया जलद करणे आणि क्लस्टरमधील भविष्यातील कामकाजांना पाठिंबा देण्यासाठी कौशल्य विकासाच्या गरजा ओळखणे या विषयांचा समावेश होता.
याव्यतिरिक्त, या भेटीत अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा, पोलिस तसेच ईएसआय आवश्यकता यासारख्या सरकारी खात्यांसोबत चर्चा, पायाभूत सुविधांच्या संरेखनावर लक्ष केंद्रित करणे आणि क्लस्टरमधील त्यांच्या आगामी कामकाजासाठी तयारी सुनिश्चित करणे, यांचा देखील समावेश होता.
“हे क्लस्टर इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात आपली उपस्थिती मजबूत करण्याच्या गोव्याच्या मोठ्या महत्त्वाकांक्षेचा एक भाग आहे,” असे श्री. खंवटे म्हणाले. “आम्ही धोरणापासून प्रत्यक्ष कृतीकडे वाटचाल करत आहोत. गुंतवणूकदारांना आणि खात्यांना येथे निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेली मंजुरी, समन्वय आणि आत्मविश्वास मिळेल, याची खात्री करून घेत आहोत. आजची बैठक केवळ प्रगतीचा आढावा घेण्याबद्दल नव्हती तर ती रस्त्यातील अडथळे दूर करण्याबद्दल आणि त्वरित गती देण्याबद्दल होती.”
ही आढावा बैठक ईएमसी तुये येथे सहकार्य, प्रतिसाद आणि भविष्य नियोजनाद्वारे उद्योगासाठी सज्ज वातावरण निर्माण करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स खात्याच्या सक्रिय दृष्टिकोन दर्शविते.