…म्हणून होणार नाही अवतार २ केरळमध्ये प्रदर्शित
जेम्स कॅमेरून यांचा ‘अवतार – द वे ऑफ वॉटर’ हा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. अवतारच्या पहिल्या भागाने बॉक्सऑफिसवर दणक्यात कमाई केली होती. अवतारह्या कमाईचा रेकॉर्ड तब्बल १० वर्षांनी मार्वेलच्या ‘एंडगेम’ या चित्रपटाने मोडला. एकूणच चित्रपटप्रेमी याच्या नवीन भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच हा चित्रपट भारतातील केरळ राज्यात प्रदर्शित होणार नसल्याचं वृत्त समोर येत आहे.
‘The Film Exhibitors United Organisation of Kerala (FEUOK)’ या केरळच्या संस्थेने कॅमेरून यांचा ‘अवतार २’ केरळमध्ये प्रदर्शित न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. चित्रपटाचे निर्माते आणि FEUOK याच्यात चित्रपटाच्या नफा वाटून घेण्याबाबत बोलणी फिस्कटली असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.
‘FEUOK’चे अध्यक्ष के.विजयकुमार यांनी याविषयी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, “आम्ही काही या चित्रपटावर बंदी घालत नाही आहोत, पण त्यांनी घातलेल्या अटी आम्हाला मान्य नाहीत. आम्ही कोणत्याही चित्रपटावर बंदी घालण्याच्या विरोधात आहोत. पण आम्ही ‘अवतार २’ हा चित्रपट केरळमध्ये प्रदर्शित करणार नाही. निर्मात्यांनी यात मध्यस्थी करावी अशी आमची अपेक्षा आहे.”
मीडिया रीपोर्टनुसार ‘अवतार २’च्या पहिल्या आठवड्यातील नफ्यापैकी ६०% नफ्याची मागणी वितरकांनी केली आहे, पण चित्रपटगृहांचे मालक ५५% पेक्षा जास्त एकही पैसा देण्यास तयार नसल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचं स्पष्ट होत आहे. चित्रपटनिर्मात्यांनी वेळीच यावर तोडगा काढला नाही तर तब्बल ४०० स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित न झाल्यास याला चांगलाच फटका बसू शकतो. १६ डिसेंबर या दिवशी ‘अवतार २’ चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. पहिल्याच दिवशी हा चित्रपट रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.