सातारा
वाहतूककोंडी विषयी थेट माझ्याशी संपर्क साधा : पृथ्वीराज चव्हाण
कराड (प्रतिनिधी) :
गेल्या दोन-तीन दिवसापूर्वी मलकापूर येथील उड्डाणपूल पाडण्यासाठी बंद करण्यात आला आणि वाहतूक सर्विस रस्त्यावरून वळवण्यात आली मात्र अक्षता मंगल कार्यालयापासून वळवण्यात आलेल्या वाहतुकीला रस्ता अपुरा पडल्याने तब्बल सहा ते सात किलोमीटरच्या महामार्गावर रांगा लागल्या.
यातच दहावी बारावीची परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. पेपर बुडतो की काय अशी अवस्था निर्माण झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी अनेकांनी पृथ्वीराज चव्हाण यांना संपर्क साधला यानंतर लगेच माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईहून संबंधित अधिकाऱ्यांची संपर्क साधून तात्काळ उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करून दिला.
यामुळे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसह वाहन चालकांनाही दिलासा मिळाला याच वाहतूककोंडी संदर्भात नुकतीच कराड येथे महामार्ग कर्मचारी प्रशासकीय अधिकारी यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीतून लवकरच याबाबत ठोस निर्णय घेण्यात येतील.
दरम्यान, महामार्गावरील वाहतूक कोंडी संदर्भात कोणतीही अडचण आल्यास थेट माझ्याशी संपर्क साधा असे आवाहन यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.