google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

‘टॉक्सिक’ला यावर्षीचा सुवर्ण मयूर

55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा सिनेमॅटिक उत्कृष्टतेच्या नेत्रदीपक प्रदर्शनाने दिमाखात समारोप झाला , ज्यात चित्रपट निर्माते, अभिनेते आणि उद्योग व्यावसायिक कथा सादरीकरणाची कला साजरी करण्यासाठी एकत्र आले होते.

लिथुआनियन चित्रपट टॉक्झिकने सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा प्रतिष्ठित सुवर्णमयुर पुरस्कार पटकावला तर रोमानियन दिग्दर्शक बोगदान मुरेसानु यांनी ‘द न्यू इयर दॅट नेव्हर केम’ साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा रौप्य मयूर पुरस्कार पटकावला.

 1. सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी सुवर्ण मयूर  : टॉक्झिक

लिथुआनियन चित्रपट टॉक्सिक ने इफ्फीचा सर्वोत्कृष्ट  चित्रपटासाठीचा सर्वात प्रतिष्ठित सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला. सॉल ब्लियुवेट यांनी निर्माता गिड्रे बुरोकेट यांच्यासह  सुवर्ण मयूर ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि 40 लाख रुपयांचे रोख पारितोषिक स्वीकारले.

ज्युरींनी या चित्रपटाची  संवेदनशीलता आणि सहानुभूतीबद्दल प्रशंसा केली, ज्यात वास्तविक आणि सामाजिक पार्श्वभूमीवर बदलत्या काळाचा वेध घेणारे कथानक मांडले आहे. टॉक्सिक हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला.”पौगंडावस्थेतील बदलांचा तसेच आर्थिकदृष्ट्या वंचित समाजात मोठे होत जाण्यातील वास्तविकतेचा शोध अत्यंत संवेदनशीलता आणि सहानुभूतीने घेत जाणारी आणि त्याच वेळी बदलत्या काळाचा वेध घेणारी ही कथा वास्तविक आणि सामाजिक परिदृश्याच्या पार्श्वभूमीवर घडते,” असे मत ज्युरींनी व्यक्त केले.

2. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी रौप्य मयूर : बोगदान मुरेसानू 

द न्यू इयर दॅट  नेव्हर केम या रोमानियन चित्रपटातील उल्लेखनीय कामगिरीसाठी  रोमानियन दिग्दर्शक बोगदान मुरेसानू यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्पर्धा श्रेणीतील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून त्यांना गौरवण्यात आले.

बोगदान मुरेसानुला रौप्य मयूर  ट्रॉफी आणि प्रमाणपत्रासह 15 लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळाले.

ज्युरींनी विशेषत: चित्रपटाच्या उत्कृष्ठ निर्मिती डिझाईन, मिस-एन-सीन आणि रूपकांचे कौतुक केले ज्याने तो काळ जिवंत साकार केला तसेच जबरदस्त आकर्षक सादरीकरण केले.

“विनोदी शोकांतिका निर्माण करणे हे कठीण काम आहे. क्रांतीच्या कालखंडातील अश्या कलाकृतीची निर्मिती महाकर्मकठीण. बॉग्डन मुरेसानू यांनी क्रांतीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या देशातील जीवनाचे वर्णन करणाऱ्या सहा कथा एकमेकात गुंफून हे काम साध्य केले आहे. उत्कृष्ट निर्मिती संरचना, नेपथ्य आणि रूपकांच्या सहाय्याने त्यांनी उभ्या केलेल्या कालखंडाला कलाकारांच्या संचाने केलेली जबरदस्त अभिनयाची कामगिरी पूरक ठरते,” असे ज्युरींनी प्रशस्तिपत्रात म्हटले आहे.

3. सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा रौप्य मयूर पुरस्कार (पुरुष आणि स्त्री):

प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनय कौशल्याचा सन्मान करत सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता (स्त्री) यांना रौप्य मयूर सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि 10,00,000 रुपये रोख देऊन गौरवण्यात येते.

4. सर्वोत्कृष्ट अभिनेता(पुरुष) साठीचा रौप्य मयूर पुरस्कार : क्लिमेंट फाव्यू  

क्लिमेंट फाव्यू  यांनी होली काऊ या फ्रेंच चित्रपटातील बारकावे असलेल्या गुंगवून टाकणाऱ्या व्यक्तिरेखेतील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता(पुरुष) हा पुरस्कार मिळवला. त्यांच्या पात्राला अस्सलता आणि खोली देण्याची त्यांची उल्लेखनीय क्षमता दर्शवणारा त्यांचा अभिनय परीक्षकांच्या मनाला भावला.
“निरागसतेकडून परिपक्वतेच्या दिशेने होणाऱ्या प्रवासातील भावनिक चढ-उतार अचूकपणे व्यक्त करणाऱ्या अविश्वसनीय वाटणाऱ्या नैसर्गिक अभिनयासाठी” क्लिमेंट फाव्यू   यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता(पुरुष) हा पुरस्कार देण्यात आला असे परीक्षकांनी सांगितले.

देश : फ्रान्स

‘हू डू आय बिलाँग टू ?’या चित्रपटातील या भूमिकेतील अविश्वसनीयरित्या नैसर्गिक अभिनयासाठी परीक्षकांनी अॅडम बेसा यांना विशेष उल्लेखनीय पारितोषिक देखील जाहीर केले.  बिलालचे पात्र वठवताना निरागसतेकडून परिपक्वतेच्या दिशेने होणारे सुलभ स्थित्यंतर दाखवत बेसा यांनी जी  भावनिक खोली दाखवली त्यासाठी परीक्षकांनी त्यांची प्रशंसा केली.

परीक्षक म्हणाले, “‘हू डू आय बिलाँग टू?’ या ट्युनिशियाच्या चित्रपटात बिलाल या भूमिकेमधील अभ्यासपूर्ण आणि संयत अभिनयासाठी परीक्षक मंडळाने अॅडम बेसा यांना देखील विशेष उल्लेखनीय पारितोषिक देऊन गौरवले आहे.”

5. सर्वोत्कृष्ट अभिनेता(स्त्री) साठीचा रौप्य मयूर पुरस्कार : व्हेस्टा मॅटलाईट आणि लेवा रुपीकायटे यांना देण्यात आला.  

व्हेस्टा मॅटलाईट आणि लेवा रुपीकायटे या दोघींना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. “मरीजा आणि क्रिस्टीना ही अविस्मरणीय पात्रे रंगवण्यासाठी स्वतःच्या शारीरिक तसेच भावनिक मर्यादेची परीक्षा पाहणाऱ्या व्हेस्टा मॅटलाईट आणि लेवा रुपीकायटे या अभिनेत्रींच्या पदार्पणातील असामान्य अभिनयासाठी” परीक्षकांनी उद्धृत केले.

6. विशेष परीक्षक पारितोषिकासाठीचा रौप्य मयूर पुरस्कार : लुईस कोउवीसीएर

फ्रेंच दिग्दर्शक लुईस कोउवीसीएर यांना त्यांच्या पदार्पणातील होली काऊ या चित्रपटासाठी विशेष परीक्षक पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.पौगंडावस्थेतून प्रौढावस्थेच्या दिशेने होणाऱ्या स्थित्यंतराच्या सार्वत्रिक संकल्पनेसाठी परीक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले. “जेव्हा एक आनंदी किशोरवयीन तरुण अचानक प्रौढावस्थेत प्रवेश करतो आणि त्याला पुढे पाऊल टाकून स्वतःच्या जीवनावर ताबा मिळवावा लागतो त्या परिस्थितीची सार्वत्रिक कथा पदार्पणात सादर केल्याबद्दल,” असे मत परीक्षकांनी व्यक्त केले.

इफ्फी दर वर्षी चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक पैलुतील उत्कृष्टतेचा विशेष परीक्षक पारितोषिक  देऊन सन्मान करते. रौप्य मयूर सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि 10,00,000 रुपये रोख असे या पारितोषिकाचे स्वरूप असते. कोउवीसीएरची कथा आनंदी जीवन जगणाऱ्या किशोरवयातील मुलाला अचानक प्रौढ व्हायला लावताना त्याच्यासमोर उभ्या राहिलेल्या आव्हानांचे वर्णन करते.

7. दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार : सारा फ्रिडलँड

अमेरिकी दिग्दर्शिका सारा फ्रिडलँड यांना त्यांच्या ‘फॅमिलियर टच’ या चित्रपटासाठी दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्काराने गौरवण्यात आले. हा पुरस्कार जागतिक स्तरावरील चित्रपटातल्या नव्या आश्वासक प्रतिभेकडे लक्ष वेधतो. सारा फ्रिडलँड यांना रौप्य मयूर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि 10,00,000 रुपये रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

”दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करताना सारा फ्रिडलँड हिने निर्मिलेली ही मार्मिक कथा आपल्याला सांगते की आपण सर्वजण वयाच्या बाबतीत सतत पुढे प्रवास करत असतो. प्रेमाचे आणि काळजीचे, विशेषतः वृद्धापकाळातील आवश्यक सेवेचे महत्त्व देखील या चित्रपटातून अधोरेखित होते. ” असे ज्युरींनी म्हटले आहे.

इफ्फी  2024 मध्ये  आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागाच्या ज्युरीमध्ये पाच प्रतिष्ठित सदस्यांचा समावेश होता: आशुतोष गोवारीकर (परीक्षक मंडळाचे अध्यक्ष); सिंगापूरचे दिग्दर्शक अँथनी चेन, ब्रिटिश-अमेरिकन निर्माती एलिझाबेथ कार्लसन, स्पॅनिश निर्माते फ्रान बोर्गिया आणि दिग्ग्ग्ज  ऑस्ट्रेलियन चित्रपट संपादक जिल बिलकॉक.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!