गोवा

‘लोहिया मैदान करा ऐतिहासिक स्थळ म्हणून घोषित…’

मडगाव : “गोवा मुक्ती चळवळीचे जनक डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या जयंतीदिनी आज मी त्यांच्या लोहिया मैदानावरील पुतळ्याला  पुष्पहार अर्पण करून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहून हे ऐतिहासिक स्थळ म्हणून अधिसुचीत करण्यास तसेच नूतनीकरणानंतर उरलेल्या त्रुटी दूर करण्याबाबत पत्र लिहिले आहे,” असे मडगावचो आवाज व युवा नेते प्रभव नायक यांनी सांगितले.


प्रभव नायक यांनी गोवा सरकारला मडगावचे लोहिया मैदान, तात्काळ “ऐतिहासिक महत्त्वाचे स्थळ” म्हणून जाहीर करण्याची मागणी केली आहे. गोवा मुक्ती चळवळीत या मैदानाची असलेली महत्त्वपूर्ण भूमिका लक्षात घेता, हे मानांकन खूप आधीच मिळायला हवे होते, असे त्यांनी नमूद केले. गरज पडल्यास अध्यादेशाद्वारे ही प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी, असेही त्यांनी पत्रात सुचवले आहे.


डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या ११६व्या जयंतीनिमित्त, मडगांवचो आवाजने लोहिया मैदानाचे ऐतिहासिक व भावनिक महत्त्व अधोरेखित करत, ते गोव्याच्या अस्मिता, संघर्ष आणि लोकशाही मूल्यांचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे.


गोवा क्रांती दिन (१८ जून २०२६) पूर्वीच या मैदानाचे पुनरुज्जीवन करून त्याला पूर्ववैभव प्राप्त करून देण्याची मागणी प्रभव नायक यांनी सरकारकडे केली आहे.

“१६ जून २०२५ रोजी लोहिया मैदानाच्या दयनीय अवस्था व्हिडिओसह आम्ही सरकारसमोर मांडली होती. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस सुधारणा झालेली नाही, असे म्हणत प्रभव नायक यांनी नाराजी व्यक्त केली.



अलीकडील नूतनीकरणानंतरही अनेक त्रुटी कायम असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. सार्वजनिक कार्यक्रमांसाठी स्टेज  रुंद व सुयोग्य करणे, स्वच्छतागृहे व कपडे बदलण्याच्या खोल्यांचे नुतनीकरण, धोकादायक पायऱ्यांची दुरुस्ती, तसेच संपूर्ण परिसराची रचना व सौंदर्य सुधारण्याची गरज असल्याचे मडगावचो आवाजने स्पष्ट केले. यासोबतच, भविष्यात अशा प्रकारचे दुर्लक्ष होऊ नये यासाठी सक्षम व स्वतंत्र संस्थेमार्फत नियमित देखभाल करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!