महाविकास आघाडी आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की
दरम्यान सत्ताधारी पक्षाचे आमदार विधानभवनाच्या पायर्यांवर विरोधी पक्षाच्या विरोधात आंदोलन करत होते त्याचवेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी गाजराच्या माळा घेऊन पायर्यांवर येत घोषणाबाजी केल्याने संतप्त झालेल्या शिंदे गटाच्या आमदारांनी विरोधी आमदारांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी केला त्याचवेळी आमदार अमोल मिटकरी मध्यस्थीसाठी गेले असता आमदार महेश शिंदे यांनी धक्काबुक्की केली त्यामुळे राष्ट्रवादी आमदार आणि शिंदे गटात जोरदार धक्काबुक्की झाल्याचे चित्र पहायला मिळाले.
अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
सत्ताधारी शिंदे गटाला महाविकास आघाडीचे आमदार विधानभवनाच्या पायर्यांवर येऊन देत असलेल्या घोषणा जिव्हारी लागत असल्याने आज त्यांनी अगोदरच विरोधात आंदोलन केले. मात्र विरोधी पक्षाच्या आंदोलनाच्या ठिकाणीच सत्ताधारी आंदोलन करत असल्याने सत्ताधारी आमदार आणि विरोधी आमदार समोरासमोर आल्याने ही परिस्थिती उद्भवली.