भ्रष्टाचाराची ‘यादवी’; शाळा बंद असताना वाटल्या सहा लाखांच्या वह्या?
मुंबई (अभयकुमार देशमुख) :
‘कुंपणच शेत खातंय…’ या म्हणीप्रमाणे समाज संघटनेच्या विश्वस्तांनीच त्या संघटनेचा विश्वासघात केल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी स्थापन झालेली महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट घोटाळेबाज विश्वस्तांचा लुटीचा अड्डा बनला आहे. लॉकडाऊनच्या काळात या लुटीने उच्चांक गाठला होता. ज्यावेळी रस्त्यावर चिटपाखरुदेखील फिरत नव्हते त्याकाळात ट्रस्टने विविध कामांसाठी एक कोटी अठरा लाख रुपये २०२०-२१ या आर्थिक वर्षात खर्च केल्याचे ताळेबंद अहवालातून समोर आलं आहे. एवढंच नाही तर धर्मादाय आयुक्त कार्यालय व संबंधित सर्व शासकीय यंत्रणा या ट्रस्टबाबत कुठल्याही स्वरुपाची माहिती माहितीच्या अधिकाराखाली देत नाहीत. त्यामुळे सर्वच यंत्रणांनी आपल्या आर्थिक हितसंबंधांपोटी ट्रस्टच्या विश्वस्तांना लुटीसाठी कुरण मोकळ करुन दिल्याचा आरोप महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टमधील सभासद करत आहेत.
७० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टवर विशिष्ट लोकांनी कब्जा केला आहे. जवळपास २५ हजारांपेक्षा जास्त सभासद या ट्रस्टचे आहेत. मात्र निवडणुकीच्या मतदानाचा आकडा दोन अंकांच्यावर कधीही गेलेला नाही. एवढचं नाही तर निवडणुक कधी लावली जाते व कधी पार पडली जाते याचा मागमूसही सभासदांना लागू दिला जात नसल्याचा आरोप काही सभासदांनीच केला आहे. तसेच ट्रस्टने विविध ठिकाणी खरेदी केलेल्या मालमत्ता, त्यांची कागदपत्रे कुठल्याही पद्धतीने सर्वांच्यासमोर आणली जात नाहीत. त्याचबरोबर ट्रस्टच्या दादर येथील सभागृहाचे भाडे व इतर स्वरुपात यातून मिळणार्या लाखो रुपयांचा कुठलाही हिशोब रेकॉर्डवर आणला जात नाही. या सर्वबाबतीत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे तक्रार करुन तसेच माहितीच्या अधिकाराचा वापर करुन पाठपुरावा केल्यानंतरही कुठल्याही स्वरुपाचा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे सभासदांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टमधील या ‘यादवी’ने आतापर्यंत ट्रस्ट स्थापन झाल्यापासून केलेल्या गैरव्यवहाराचा आकडा १०० कोटींच्या घरात जात असल्याचं ताळेबंदावरुन प्रथमदर्शनी दिसत आहे. लॉकडाऊनच्या काळात सगळी शाळा, महाविद्यालये बंद असताना व लोकांना फिरण्यासाठी मज्जाव असताना ट्रस्टने मात्र तब्बल १ कोटी १८ लाख रुपये खर्च केल्याचा ताळेबंद धर्मादाय कार्यालयाकडे जमा केला आहे. पण शाळा बंद असताना साडेलाख रुपयांच्या वह्या कोणाला वाटण्यात आल्या. तसेच अडीच लाखांची शिष्यवृत्ती व पाठ्यपुस्तके कोणत्या लाभार्थ्यांना दिली गेली, हे मोठे कोडे आहे. एवढंच नाही तर तब्बल १ लाख २७ हजार रुपयांचा चहा वर्षभरात नेमका कोणाला पाजण्यात आला, असे अनेक प्रश्न सभासदांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केले आहेत.
तसेच छपाई व स्टेशनरी खर्च ६८,७४५ दाखविण्यात आला आहे. मात्र याकाळात कसली छपाई केली व कोणती स्टेशनरी आणली गेली याचे कोणतेही उत्तर ट्रस्टकडे नाही. सभा खर्च तब्बल तीन लाख चाळीस हजार दाखविण्यात आला आहे. गाडीभाडे एक लाख चाळीस हजार दाखविण्यात आले आहे. या काळात नेमक्या कुठे गाड्या फिरल्या असा सवाल सभासदांकडून उपस्थित केला जात आहे. संगणक देखभाल खर्च जवळपास नव्वद हजार दाखविण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात कार्यालयेच बंद होती तर संगणक चालण्याचा प्रश्नच येत नाही. असे असताना कुठल्याही नावावर वरवर खर्चाचा तपशिल देण्यात आला आहे. महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टमधील या बेदरकार यादवीमुळे समाजाचा पैसा वारेमापपणे उधळला गेल्याचा संशय गडद झाल्याच्या भावना समाजबांधव व्यक्त करीत आहेत.
कोर्ट बंद असून वकिलांना कुठली फी?
लॉकडाऊन काळात सगळी न्यायव्यवस्थाच ठप्प होती. कोर्टकचेऱ्या बंद होत्या. असं असतानाही ट्रस्टकडून तब्बल सव्वा दोन लाखांचा खर्च ‘वकील व प्रोफेशनल फी’ म्हणून दाखविण्यात आला आहे. सगळं काही बंद असताना ट्रस्टने एवढी रक्कम नेमक्या कोणत्या वकिलाला व का दिली, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या संचालक बॉडीवर सहा शासकीय अधिकारी नियमबाह्यपणे कार्यरत आहेत आणि या सर्वांनी राजकारणी, सरकारी कर्मचारी यांच्या मदतीने ट्रस्टची मोठ्या प्रमाणात लुटालूट केली आहे. एवढंच नाही तर, सर्वसाधारण सभेत ट्रस्टची मालमत्ता २०० कोटी रुपयांपेक्षा जास्तीची असल्याचे सांगितले जाते. मात्र, या मालमत्तांवर स्वत:ची खासगी मालमत्ता असल्यासारखे ठराविक लोक कब्जा करुन बसले आहेत.
– संदीका वाझे
माजी विश्वस्त
आमच्या महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टबद्दल जे लोक गैरव्यवहाराच्या अफवा पसरवत आहेत, ते पूर्णपणे चुकीचे आहे. दोन वर्षांतील हे आकडे असून याला लॉकडाऊनमधील खर्च म्हणणे चुकीचे आहे. आमच्या ट्रस्टचा व्यवहार व्यवस्थित आहे.
– अशोक दाते
अध्यक्ष, महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट