
गोवामहाराष्ट्र
मराठी ‘काळीज उसवलां’चे २० रोजी मुंबईत प्रकाशन
मुंबई :
प्रसिद्ध कोंकणी साहित्यिक उदय म्हांबरो लिखित ‘काळीज उसवलां’ या बहुचर्चित आत्मपर ललित लेखांच्या मराठी अनुवादित आवृत्तीचे प्रकाशन २० डिसेंबर रोजी विलेपार्ले येथे होत आहे. पौर्णिमा केरकर यांनी कोंकणीतून मराठीमध्ये अनुवादित केलेले हे पुस्तक सहित प्रकाशनच्या वतीने प्रकाशित होत असून, गोव्याचे माजी उच्च शिक्षण संचालक भास्कर नायक यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
‘आमी गोंयकार’ या मुंबईस्थित गोमंतकीय नागरिकांच्या संस्थेच्यावतीने २० रोजी संध्याकाळी ४.३० वाजता, गोमंतक सेवा संघ, पहिला मजला, मालवीय रोड, विलेपार्ले पूर्व येथे या प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रकाशन कार्यक्रमानंतर लेखक उदय म्हांबरो यांची दिशा प्रभू या पुस्तकाच्या अनुषंगाने मुलाखत घेणार आहेत. या कार्यक्रमाला निशा पारसनीस या विशेष अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत. १९ डिसेंबरच्या गोवा मुक्ती दिनाचे औचित्य साधत यावेळी गोवा मुक्तीलढ्यात सहभाग असलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
मराठीमध्ये अनुवाद होण्यापूर्वी ‘काळीज उसवलां’ या मूळ कोंकणी पुस्तकाने गोव्यात मोठा वाचकाश्रय जोडला असून, या पुस्तकाचे मल्याळम भाषेत आणि त्याचप्रमाणे कन्नड – कोंकणी लिपीत लिप्यांतर देखील प्रकाशित झाले असून, या दोन्ही भाषेतील वाचकांनी देखील या पुस्तकाला मोठ्या प्रमाणात आपलेसे केले आहे. कित्येक दिवसांपासून सदर पुस्तक मराठीमध्येदेखील प्रकाशित व्हावे, अशी वाचकांची इच्छा होती.
या प्रकाशन सोहळ्यावेळी ‘आमी गोंयकार’ संस्थेच्यावतीने ‘सुरिले गोंयकार’ या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजनदेखील करण्यात आले असून, वाचकांनी दोन्ही कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मोहन संजगिरी यांनी केले आहे.


