SSC निकाल : १२२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण
मुंबई :
विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून ज्या दहावीच्या निकालाची (SSC result) आतुरता लागली होती तो निकाल आज (१७ जून) जाहीर होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) पत्रकार परिषद घेत या निकालाची घोषणा केली. यात मंडळाकडून विभागनिहाय निकालाची टक्केवारीचे तपशीलही जाहीर करण्यात आले.
दरवर्षी मागील वर्षाशी निकालाची तुलना होते. २०२१ मध्ये अंतर्गत मुल्यमापनाद्वारे निकाल घोषित करण्यात आला होता. त्यामुळे २०२० ची तुलना २०२२ शी केली असता २०२० च्या तुलनेत २०२२ चा निकाल १.६४ टक्क्यांनी जास्त आहे. २०२१ मध्ये हा निकाल ९९.९५ टक्के होता.
राज्यातील २२ हजार ९२१ माध्यमिक शाळांमधून १६ लाख ३८ हजार ९६४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यापैकी १२ हजार २१० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
दहावी परीक्षेत एकूण ६६ विषयांपैकी २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. राज्यातून नियमित विद्यार्थ्यांपैकी ६ लाख ५० हजार ७७९ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ५ लाख ७० हजार २७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २ लाख ५८ हजार २७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, ४२ हजार १७० विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
राज्यातून एकूण ८ हजार १६९ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, त्यापैकी ८ हजार २९ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यातील ७ हजार ५७९ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.४० आहे.
नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९७.९६ टक्के इतकी आहे, तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.०६ टक्के आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा १.९० टक्के इतकी जास्त आहे. अशाप्रकारे यावर्षी देखील मुलींनीच बाजी मारली.