नवज्योत बांदिवडेकर यांना भारतीय चित्रपटासाठीचा ‘पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ पुरस्कार
55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 मध्ये नवज्योत बांदिवडेकर ‘घरत गणपती’ या त्यांच्या मराठी चित्रपटासाठी भारतीय चित्रपटासाठीचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे. हा पुरस्कार बांदिवडेकर यांचा दिग्दर्शनातील पदार्पणाचा प्रभाव अधोरेखित करतो आणि त्यांना चित्रपट उद्योगातील एक नव्या दमाचा प्रतिभावान दिग्दर्शक म्हणून पाहतो.
भारतीय सिनेमाच्या उत्क्रांतीत युवा प्रतिभावंतांच्या योगदानाची दखल घेत देशभरात चित्रपट निर्मिती करणाऱ्या युवा प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने यंदाच्या इफ्फी आवृत्तीसाठी भारतीय चित्रपटासाठीचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार नव्याने सुरू केला आहे.
प्रमाणपत्र आणि 5 लाख रुपये रोख, असे स्वरूप असलेला हा पुरस्कार इफ्फीच्या समारोप सोहळ्यात नवज्योत बांदिवडेकर यांना त्यांच्या ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटाद्वारे प्रभावीरित्या मांडलेल्या कथेसाठी प्रदान करण्यात आला.
परंपरेला आणि आधुनिक संवेदनांना जोडणारी हृदयस्पर्शी कथा सादर करण्याच्या क्षमतेबद्दल परीक्षकांनी बांदिवडेकर यांची दिग्दर्शक म्हणून प्रतिभा दाखवल्याबद्दल प्रशंसा केली.
“बांदिवडेकरांनी कौटुंबिक बंधांची गुंतागुंत मोठ्या खुबीने टिपली आहे. उत्कट भावनिक नादमयता कायम राखताना कौटुंबिक जीवनातील बारकावे उत्तमरीत्या अधोरेखित केले आहेत, त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात चित्रपटाची भट्टी उत्तम जमली आहे,” अशा शब्दांत ज्युरींनी त्यांचे कौतुक केले.
ट्रेलर पहा:
पूर्वावलोकन समितीने शिफारस केलेल्या पाचही चित्रपटांचे पुनरावलोकन केल्यानंतर, ज्युरींनी त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बांदिवडेकर यांची एकमताने निवड केली. प्रशस्ती पत्रात ज्युरींनी ‘घरत गणपती’चे सुरेख कथा सादरीकरण आणि दमदार अभिनयाबद्दल कौतुक केले आहे. “वेगवेगळ्या पिढ्यांमध्ये काही छोटे मतभेद असले तरी कुटुंबातील ऐक्याचे प्रभावीरित्या दर्शन घडवले आहे,” असे ज्युरींनी प्रशस्ती पत्रात नमूद केले आहे.
सर्वोत्कृष्ट पदार्पणीय दिग्दर्शक या श्रेणीच्या ज्युरीमध्ये संतोष सिवन (अध्यक्ष), सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक . सुनील पुराणिक, अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता;. शेखर दास, चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक;. एम. व्ही. रघु, सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक; विनित कनोजिया, चित्रपट निर्माता, लेखक आणि संकलक यांचा समावेश होता.
देशभरातील चित्रपट आणि कला समुदायातील प्रख्यात व्यावसायिकांचा समावेश असलेल्या पूर्वावलोकन समितीने 117 पात्र प्रवेशिकांमधून पाच चित्रपट निवडले. भारतीय चित्रपटासाठीचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार श्रेणीसाठी स्पर्धा करणारे चित्रपट पहा.
“घरत गणपती मध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांचे परस्परांमधील नाते विविध आनंदाने भरलेल्या तसेच गोंधळलेल्या परिस्थितीमधून शोधले आहे,” असे नवज्योत बांदिवडेकर यांनी काही दिवसांपूर्वी पीआयबीने, गोवा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते.