
भू-राजकीय जोखमींकडे उद्योगांचा दुर्लक्ष; केवळ १९% कंपन्यांकडून नियमित मूल्यमापन
मुंबई : जागतिक स्तरावर वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय उद्योगसमूहांमध्ये जोखीम व्यवस्थापनाबाबत गंभीर तफावत असल्याचे स्पष्ट झाले आहे. टाटा AIG जनरल इन्शुरन्स कंपनी आणि डन अँड ब्रॅडस्ट्रीट इंडिया यांच्या संयुक्त ‘होरायझन वॉच इमर्जिंग रिस्क रिपोर्ट’नुसार, केवळ १९ टक्के व्यावसायिक नेते भू-राजकीय जोखमीचे नियमित मूल्यमापन करतात, तर ६३ टक्के उद्योगांना आंतरराष्ट्रीय संघर्षांचा त्यांच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची भीती आहे.
अमेरिका-इराण तणावासह मध्यपूर्वेतील अस्थिर परिस्थितीमुळे जागतिक पुरवठा साखळीवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनी आणि लाल समुद्र मार्गावरील तणावामुळे वाहतूक खर्च वाढ, माल पाठवण्यात विलंब आणि कच्च्या मालाच्या किमतीत चढ-उतार यांसारख्या समस्या वाढल्या आहेत. याचा थेट परिणाम उद्योगांच्या नफ्यावर आणि व्यवसाय सातत्यावर होत आहे.
अहवालासाठी आयटी, आयटीईएस, रसायन व औषधनिर्माण, वाहन उद्योग तसेच वित्तीय सेवा क्षेत्रातील सुमारे ३०० भारतीय उद्योगनेत्यांचा सर्वेक्षणाद्वारे अभ्यास करण्यात आला. त्यापैकी ६० टक्क्यांहून अधिक प्रतिसादकर्त्यांनी लॉजिस्टिक्स आणि वाहतूक क्षेत्रातील अडथळे हे मोठे आव्हान असल्याचे नमूद केले. तसेच ४८ टक्के उद्योगांनी आर्थिक मंदी, वाढते व्याजदर आणि महागाई याबाबत चिंता व्यक्त केली.
तज्ज्ञांच्या मते, भू-राजकीय संघर्ष, तांत्रिक अडथळे आणि बदलते नियामक वातावरण यामुळे जोखीम व्यवस्थापन अधिक गुंतागुंतीचे होत आहे. मात्र, काही उद्योगांनी पुरवठादारांचे विविधीकरण, परिस्थितीनिहाय नियोजन आणि विमा-आधारित उपाययोजना स्वीकारून या अनिश्चिततेतून मार्ग काढण्यास सुरुवात केली आहे.
टाटा AIGचे कमर्शियल बिझनेस डिस्ट्रिब्युशन प्रमुख दीपक संकर यांनी सांगितले की, “जोखीम बुद्धिमत्ता आणि व्यापक विमा उपाय यांचे संयोजन केल्यास उद्योगांना उदयोन्मुख अनिश्चिततेतही व्यवसाय सातत्य राखता येऊ शकते.”
या पार्श्वभूमीवर, उद्योगांनी केवळ प्रतिक्रियात्मक न राहता सक्रिय जोखीम व्यवस्थापन धोरण स्वीकारण्याची गरज अधोरेखित होत आहे. पुरवठा साखळी मजबूत करणे, पर्यायी स्रोतांचा शोध आणि विमा संरक्षण यांचा योग्य समन्वय साधल्यास अनिश्चिततेचे रूपांतर दीर्घकालीन स्पर्धात्मक सामर्थ्यात करता येईल, असा अहवालाचा निष्कर्ष आहे.


