पाकिस्तानचे माजी परवेज राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांचे निधन
Pervez Musharraf Passes Away: पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांचे निधन झाले आहे. दुबईमधील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. परवेज मुशर्रफ हे गंभीर आजारांचा सामना करत होते. मुशर्रफ 2001 ते 2008 या काळात पाकिस्तानचे अध्यक्ष होते. याआधी ते लष्करप्रमुखही होते. कारगिल युद्धासाठी परवेझ मुशर्रफ यांना थेट जबाबदार धरले जाते. त्यांनीच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान मियाँ नवाझ शरीफ यांना पदच्युत केले.
मार्च 2016 मध्ये मुशर्रफ उपचारासाठी दुबईला (Dubai) गेले होते, तेव्हापासून ते तिथे उपचार घेत होते. याआधीही त्यांच्या मृत्यूच्या बातम्या अनेकवेळा आल्या होत्या, मात्र त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्या वृत्तांचे खंडन केले होते. प्रदीर्घ आजारपणात ते अनेकदा व्हेंटिलेटरवर होते. पण यावेळी त्यांनी जीवनाशी सुरु असलेली झुंज संपवली.
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच माजी राष्ट्राध्यक्षांना अशी शिक्षा सुनावण्यात आली होती. पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखालील विशेष न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने फाशीची शिक्षा सुनावली होती.
दरम्यान, पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांची फाशीची शिक्षा लाहोर उच्च न्यायालयाने रद्द करण्याचा निर्णय दिला होता. देशद्रोहाच्या आरोपात इस्लामाबादच्या विशेष न्यायालयाने त्यांना ही शिक्षा सुनावली होती. विशेष न्यायालयाने दिलेला निर्णय असंवैधानिक असल्याचे लाहोर उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मुशर्रफ यांनी त्यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेला लाहोर उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले होते.