google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवासिनेनामा 

प्रसार भारतीचा WAVES द्वारे OTT माध्यमात प्रवेश

गोव्यामध्ये सुरु असलेल्या 55 व्या इफ्फी (IFFI), अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज प्रसार भारती या राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण माध्यमाच्या WAVES (वेव्स), या OTT व्यासपीठाचे उद्घाटन केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू, यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

डिजिटल स्ट्रीमिंग सेवांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी, ‘दूरदर्शन’, या भारताच्या अग्रगण्य सार्वजनिक प्रसार माध्यमाने OTT (ओव्हर-द-टॉप) व्यासपीठाच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. आधुनिक डिजिटल ट्रेंडचा स्वीकार करताना, क्लासिक, या श्रेणीतील सामग्री आणि समकालीन कार्यक्रमांचा समृद्ध संयोग साधत, प्रेक्षकांचा नॉस्टॅल्जिया (गत काळातील आठवणी) पुन्हा जागवणे, हे या व्यासपीठाचे उद्दिष्ट आहे. रामायण, महाभारत, शक्तीमान आणि हम लोग यासारख्या लोकप्रिय मालिकांचा संग्रह उपलब्ध करणारे हे व्यासपीठ, भारताच्या भूतकाळाशी सांस्कृतिक आणि भावनिक बंध जोडू पाहणाऱ्या प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित करते. या व्यतिरिक्त, हे व्यासपीठ बातम्या, माहितीपट आणि प्रादेशिक सामग्री प्रदर्शित करून, सर्वसमावेशकता आणि विविधतेप्रति असलेली आपली वचनबद्धता अधिक दृढ करते.

अनेक दशकांची आपली परंपरा आणि देशाचा विश्वास या बळावर, दूरदर्शनचे हे OTT व्यासपीठ, पारंपारिक टेलिव्हिजन आणि आधुनिक स्ट्रीमिंगमधील अंतर भरून काढते, आणि एकाच वेळी तंत्रज्ञान-स्नेही युवा वर्ग आणि जुन्या पिढीपर्यंत पोहोचते.

WAVES ने हिंदी, इंग्रजी, बंगाली, मराठी, कन्नड, मल्याळम, तेलगू, तमिळ, गुजराती, पंजाबी, आसामी यासह 12 पेक्षा जास्त भाषांमधील आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनासह भारतीय संस्कृतीचा पुरस्कार करणाऱ्या सर्वसमावेशक भारतीय कथांसह एक मोठा समूह म्हणून OTT व्यासपीठावर प्रवेश केला आहे. इन्फोटेनमेंटच्या 10 पेक्षा जास्त प्रकारांमध्ये त्याचा प्रसार केला जाईल. हे व्यासपीठ, ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) चे पाठबळ असलेल्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मागणीनुसार व्हिडिओ, फ्री-टू-प्ले गेमिंग, रेडिओ स्ट्रीमिंग, थेट टीव्ही स्ट्रीमिंग, 65 लाइव्ह चॅनल, व्हिडिओ आणि गेमिंग सामग्रीसाठी ॲप चा समावेश असलेले अनेक ॲप, आणि ऑनलाइन खरेदी, यासारख्या सेवा प्रदान करेल.

सृजनशील अर्थव्यवस्थेतील युवा चित्रपट निर्मात्यांच्या क्षमतांना वाव देण्यासाठीचे एक जाणीवपूर्वक पाऊल म्हणून, WAVES ने कामिया जानी, आरजे रौनक, श्रद्धा शर्मा यांच्यासह यांच्यासह आशय संपन्न साहित्य निर्माण करणाऱ्या राष्ट्रीय क्रिएटर अवॉर्ड पुरस्कार प्राप्त कंटेंट निर्मात्यांसाठी देखील आपले व्यासपीठ उपलब्ध केले आहे.

WAVES ने FTII, अन्नपूर्णा, AAFT यासारख्या चित्रपट आणि माध्यम प्रशिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांनी आपल्या पदवी पूर्व वर्षात बनवलेल्या चित्रपटांसाठी आपले पोर्टल उपलब्ध केले आहे.

इफ्फी (IFFI) महोत्सवात WAVE या व्यासपीठावर नवीन चित्रपट आणि कार्यक्रम प्रदर्शित केले जातील.

इफ्फी 24 च्या युवा चित्रपट निर्मात्यांच्या संकल्पनेला अनुरूप रोल नं. 52 हा नागार्जुन आणि अमला अक्किनेनी यांच्या अन्नपूर्णा फिल्म आणि मीडिया स्टुडिओच्या विद्यार्थ्याने बनवलेला चित्रपट वेव्हज मध्ये प्रदर्शित केला जाईल.

 

1980 च्या दशकातील फौजी या शाहरुख खानच्या मालिकेचे आधुनिक रूपांतर असलेला फौजी 2.0, दिग्दर्शक संदीप सिंग द्वारे प्रदर्शित केला जाईल आणि त्यात गौहर खानची भूमिका आहे. ऑस्कर विजेती गुनीत मोंगा कपूर तिचा सामाजिक बदल घडवणारा चित्रपट किकिंग बॉल्स प्रदर्शित करेल जो बालविवाहावरील सत्य कथा आहे; जॅक्सन हाल्ट हा क्राईम थ्रिलर सिनेमा निर्मात्या नीतू चंद्रा द्वारे प्रदर्शित केला जाईल तर मोबाईल टॉयलेटचा सामाजिक संदेश देणारा जाईये आप कहाँ जाएंगे हा संजय मिश्रा प्रदर्शित करतील.

वेव्ह्ज मध्ये अयोध्येतील प्रभू श्रीराम लल्लाची लाइव्ह आरती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मासिक मन की बात सारख्या लाईव्ह कार्यक्रमांचा समावेश आहे. आगामी यूएस प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा 22 नोव्हेंबरपासून व्हेव्ह्जवर थेट प्रसारित केली जाईल. व्हेव्ह्ज ने सीडीएसी ,इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या भागीदारीमध्ये दैनिक व्हिडिओ संदेशांसह सायबर सुरक्षा जागरूकता मोहीम देखील सुरू केली आहे. या मोहिमेला सायबर क्राइम की दुनिया (एक काल्पनिक मालिका) आणि सायबर अलर्ट (डीडी न्यूज शो ) यांसारख्या कार्यक्रमांचा पाठिंबा आहे.

व्हेव्ह्ज वरील काही इतर चित्रपट आणि शो मध्ये फँटसी ॲक्शन सुपरहिरो मंकी किंग द हिरो इज बॅक, राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट फौजा, अरमान, विपुल शाहचा थ्रिलर शो भेद भरम, पंकज कपूर अभिनित कौटुंबिक नाट्य थोडे दूर थोडे पास , कैलाश खेर यांचा भारत का अमृत कलश हा संगीत रिॲलिटी शो, सरपंच, हॉटमेल चे संस्थापक साबीर भाटिया यांचा BeCubed , महिला केंद्रित शो आणि चित्रपट कॉर्पोरेट सरपंच, दशमी, आणि करियाथी, जानकी यांचा समावेश आहे. व्हेव्ह्ज मध्ये डॉगी ऍडव्हेंचर, छोटा भीम, तेनालीराम, अकबर बिरबल यासारखे लोकप्रिय निवडक ॲनिमेशन कार्यक्रम आणि कृष्णा जंप, फ्रूट शेफ, राम द योद्धा , क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धा यांसारख्या खेळांचा देखील समावेश आहे.

वेव्हज मंचावरील सामग्रीचे स्वरूप, भाषा, शैली आणि पोहोच यांच्या व्दारे कलाकृतींच्या भांडाराचा विस्तार करत दूरदर्शन, आकाशवाणी तसेच खासगी वाहिन्यांवरील बातम्या, नेहमीचे मनोरंजन, संगीत, अध्यात्मिक, क्रीडाविषयक अशा विविध प्रकारचे कार्यक्रम थेट प्रसारित करणार आहेत.

केंद्र सरकारची तसेच राज्य सरकारांची मंत्रालये देखील या उपक्रमासाठी प्रसार भारतीसोबत एकत्र येऊन अर्थपूर्ण संदेश देण्यासाठीचे परिणामकारक साधन म्हणून माहितीपर नाटके, नाट्यमय अथवा काल्पनिक विषयांवर आधारित कार्यक्रम, मनोरंजन मूल्य असलेले रिअॅलीटी शो यांसारखे वैविध्यपूर्ण कार्यक्रम सह-विकसित करण्यात योगदान देणार आहेत.

यापैकी काही कार्यक्रमांमध्ये देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त तयार केलेला माहितीपट, भारतातील चित्रपट या नावाचे एनएफडीसीचे भांडार, विषयानुसार लावलेल्या छायाचित्रांच्या अल्बममध्ये लावण्यात आलेली केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या दुर्मिळ खजिन्यातील ऐतिहासिक छायाचित्रे तसेच जर्नल्स आणि इतर प्रकाशने यांचा समावेश आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, केंद्रीय अर्थ मंत्रालय, आयजीएनसीए, केंद्रीय संस्कृती मंत्रालय तसेच भारतीय टपाल विभाग यांनी देखील वेव्हजसाठी माहितीपूर्ण तसेच मनोरंजनपर कार्यक्रमांसाठी योगदान दिले आहे.

वेव्हज उपक्रमाचा डिजिटल अनुभव भारतीय मूल्यांना आधुनिक रुप, जाणीव जागृती, वापरकर्त्यांसाठी सुलभ इंटरफेस, क्रॉस-प्लॅटफॉर्म सुसंगतता, व्यक्तिगत प्रोफाईल्स आणि काळजीपूर्वक निवडण्यात आलेल्या कार्यक्रम यांच्याशी एकरूप करतो आणि स्ट्रीमिंगच्या अनुभवाचे मूल्यवर्धन करतो.

वेव्हजची सुरुवात केवळ प्रसार भारतीसाठीच नव्हे तर डिजिटल माध्यमे आणि ओटीटी यांच्या प्रेक्षकांसाठी एक संपूर्ण परिसंस्था बनण्याच्या दिशेने घेतलेली मोठी झेप ठरणार आहे.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!