
प्रियोळ भाजपचेच; मुख्यमंत्र्यांनी ठणकावले
प्रियोळ:
भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या महामेळाव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विशेष हजेरी लावली होती, यावेळी त्यांनी आगामी मतदानावर काही रोखठोक वक्तव्य केलं आहे. प्रियोळ मतदारसंघ हा कायम भारतीय जनता पक्षाचाच राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला असून डबल इंजिनचं सरकारच कायम राहील असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. ज्या आमदारांना भारतीय जनता पक्षातर्फे मतदानात सामील व्हायचं नसेल त्यांनी आताच याबद्दल माहिती द्यावी असं थेट विधान केल्यानं सध्या हा मुद्दा चर्चेत आहे.
भारतीय जनता पक्ष हा विरोधी नेत्यांसारखा नाही, केवळ मतदानाच्या काळात गावागावांमध्ये फिरून प्रचार करणारा हा पक्ष नाही. भारतीय जनता पक्ष हा अंतोदय तत्वावर काम करणारा पक्ष आहे, मतदानाच्यावेळी फक्त मतदारांच्या घरांसमोर उभा राहणारा हा पक्ष नाही.
आजवर राज्यातील गरजू लोकांपर्यंत पोहोचून त्यांना मदत करणं हेच पक्षाचं ध्येय आहे. गरजू लोकांना पेन्शनची सेवा मिळवून देणं असुदे किंवा अपंगत्व आलेल्यांना आर्थिक मदत करणं भाजप कायम त्यांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. पर्पल फेस्टिव्हलच्या अंतर्गत सरकारने ११ हजार अपंगत्व आलेल्या लोकांना मदत पुरवली आहे. लोकांना भुलवणारे अनेक असतील मात्र भारतीय जनता पक्ष तसा नाही.
येत्या दोन वर्षांमध्ये गोव्यात पुन्हा एकदा मतदान होणार आहे. त्यापूर्वी डिसेंबर महिन्यात जिल्हा पंचायतीचे मतदान होईल, यानंतर नगरपालिकेचे मतदान होईल आणि यानंतर मतदानाचे ढोल वाजायला सुरुवात होणार आहे. ज्यांना युती मान्य नाही त्यांनी आताच याबद्दल पक्षाला माहिती देत मतदानाची तयारी करावी, सरकार हे भारतीय जनता पक्षाचं आहे त्यामुळे कोणाचीही मनमानी खपवून घेतली जाणार नाही असे थेट वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले आहे.