google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

समांतर सिनेमांचे दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन

y : ‘मंथन’, ‘अंकुर’, ‘निशांत’, ‘भूमिका’ अशा अनेक समांतर सिनेमांचे निर्माते व दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन झाले आहे. भारतीय सिनेसृष्टीत महत्त्वाचं योगदान देणारे श्याम बेनेगल यांनी आज (२३ डिसेंबरला) अखेरचा श्वास घेतला. त्यांची मुलगी पिया बेनेगल हिने यासंदर्भात इंडियन एक्सप्रेसला माहिती दिली आहे. श्याम बेनेगल यांच्या निधनाचे वृत्त खरे आहे, असं पियाने सांगितलं.

श्याम बेनेगल ९० वर्षांचे होते. आज संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असं त्यांच्या मुलीने सांगितलं. पिया बेनेगल ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना म्हणाली, “श्याम बेनेगल यांचे आज (२३ डिसेंबरला) संध्याकाळी ६.३० वाजता निधन झाले.”

श्याम बेनेगल यांनी समांतर सिनेमांच्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीत मोठं योगदान दिलं. त्यांना त्यांच्या सिनेमांसाठी प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तसेच त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत तब्बल १८ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळवले होते. त्यांना १९७६ मध्ये पद्मश्री आणि नंतर १९९१ मध्ये भारताचा तिसरा-सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.

पिया बेनेगलने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल येथील वोकार्ट हॉस्पिटलमध्ये आज सायंकाळी श्याम बेनेगल यांची प्राणज्योत मालवली. श्याम बेनेगल बऱ्याच काळापासून क्रोनिक किडनीच्या समस्येने ग्रस्त होते. ते या आजाराच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचले होते. आज उपचारा दरम्यान रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराबद्दल लवकरच निर्णय घेतला जाईल.

‘अंकुर’, ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’, ‘जुनून’ हे आणि असे अनेक चित्रपट त्यांनी दिले. ‘अंकुर’मुळे हिंदी सिनेसृष्टीला शबाना आझमी नावाची अभिनेत्री मिळाली. समांतर सिनेमा दिग्दर्शित करण्यात त्यांचं खूप मोठं योगदान होतं. ‘अंकुर’ या त्यांच्या पहिल्यावहिल्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तसंच ‘निशांत’, ‘मंथन’, ‘जुनून’, ‘आरोहण’ या चित्रपटांनाही राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले आहेत. ‘महाभारत’ या संकल्पनेवर त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘कलयुग’ हा सिनेमा आजही सिनेसृष्टीतला मास्टरपीस मानला जातो. ‘सरदारी बेगम’ हा त्यांचा उर्दू सिनेमाही अनेक कारणांनी चर्चेत राहिला. तर ‘झुबैदा’ हा सिनेमाही चर्चेत होता. ‘नेताजी सुभाषचंद्र बोस द फरगॉटन हिरो’ आणि ‘वेल डन अब्बा’ हे त्यांचे अलिकडचे चर्चेत राहिलेले चित्रपट आहेत. समांतर सिनेमाशी श्याम बेनेगल यांची नाळ जोडली गेली होती. त्यांच्या चित्रपटांमधून अनंत नाग, नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, शबाना आझमी, स्मिता पाटील हे कलाकार घडले. एका मनस्वी दिग्दर्शकाने आज अखेरचा श्वास घेतला आहे. समांतर सिनेमाचं युग पोरकं झाल्याची भावना आज प्रत्येकाच्या मनात आहे.

 

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!