google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

‘फिल्म बाझार’मध्ये गाजली आगळी वेगळी ‘मूक रामलीला’

पणजी : 
रामलीला या प्रकाराबद्दल प्रत्येकाने ऐकले आणि काहींनी तर पाहिले पण असेल. परंतु मूक रामलीलेबाबत क्वचितच कुणी ऐकले असेल. मूक रामलीला हा तसा भरपूर जुना प्रकार असून शस्त्रविद्या शिकविण्याच्या माध्यमातून मूक रामलीलेचा जन्म झाला.  राजस्थानातील  बिसाऊ या गावात मागील ८० वर्षापासून मूक रामलीलाची परंपरा टिकवून ठेवली आहे. नुकत्याच झालेल्या फिल्म बाझारमध्ये ज्येष्ठ माहितीपट निर्माते रजनी आचार्य यांनी निर्माण केलेल्या या मूक रामलीलेवरील विशेष माहितीपटाने उपस्थितांची वाहवा मिळवली.

बिसाऊ येथील मूक रामलीला ही जगप्रसिद्ध आहे. शारदीय नवरात्रात रामलीलाला सुरूवात होते व॒ १५ दिवस ही रामलीला सादर केली जाते. राजस्थानातील बिसाऊ गावात मूक रामलीला मागील ८० वर्षापासून  सादर केली जात आहे. गावातील लोकसुद्धा रामलीला करतात. ही मूक रामलीला इतर रामलीलासारखीच दिसत असली तरी यात पात्रांचा संवाद नसतो, त्यामुळे ती सर्वांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. विशेष म्हणजे जो लहानपणी रामची भूमिका करतो तो मोठेपणी रावणाची भूमिका करतो. ही परंपरा आजपर्यंत सुरू आहे.

Rajani aacharya
रजनी आचार्य

देशाच्या स्वातंत्र्य चळवळीदरम्यान काही स्वातंत्र्यैनिक या गावात लपले होते. ज्यात एक महिला होती त्यांनी गावातील मुलांना शस्त्रविद्या शिकविण्यासाठी मूक रामलीलाचे आयोजन केले. भारतीय लोककला, संस्कृती, परंपरा समाजापर्यंत पोहचविण्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. या रामलीलामध्ये कुठल्याही प्रकारचे संवाद नसतात. हावभावातून ही रामलीला लोकांपर्यंत पोहोचविली जाते अशी माहिती रजनी आचार्य यांनी दिली.

बिसाऊ की मूक रामलीला ही फिल्मच्या रूपात श्री रामलीला प्रबंध समिती बिसाऊ व कमल पोद्दार यांच्या संयुक्‍त विद्यमाने सादर करण्यात येत असून तीन तासाची ही मूक रामलीला एक तासामध्ये करण्यात आली आहे. आचार्य धनंजय व्यास यांच्या मदतीने दोहा, चौपाई, यासारखी गीते तयार केली असून संगीत कुलदीप सिंह यांचे तर अनुराथा पौडवाल, अनुप जलोटा, जसविंदर सिंह, सीमा मिश्रा यांनी पार्श्वगायन केले आहे. तसेच मनजितसिंह कोहली यांनी रामलीलाचे कथन केले आहे.
या रामलीलामध्ये १०० कलाकार आहेत. काही कलाकार तर दोन दोन भूमिका करतात. याशिवाय हे सर्व कलाकार बिसाऊमधील आहेत असे रजनी यांनी सांगितले.  लोककलाप्रकार लोकांपर्यंत पोहचण्यासाठी  ‘पथनाट्याप्रमाणे बिसाऊंच्या रस्त्यावर पूर्ण सेट उभारून ही मूक रामलीला सादर केली जाते. या रामलीलामध्ये संवाद नसले तरी पार्श्वगायन, पार्श्वसंगीत या प्रकारचा समावेश असतो. पार्श्वगायनात चौपाई, दोहे म्हटले जातात. मूक रामलीला ही बिसाऊची परंपरा आहे आणि हीच परंपरा आणि लोककलाप्रकार लोकांपर्यंत पोहचावा
यासाठी चित्रपट तयार केला आहे. असे रजनी आचार्य सांगतात.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!