sahitya academy : प्रकाश पर्येकरांच्या ‘वर्सल’ला साहित्य अकादमी
Sahitya Academy award : गोव्यातील प्रसिद्ध कोकणी साहित्यिक डॉ. प्रकाश पर्येकर यांच्या ‘वर्सल’ या पहिल्याच कथासंग्रहाला कोकणीतून, तर मराठीतील आघाडीचे साहित्यिक कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला बुधवारी साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर झाले. या दोन्ही साहित्यिकांवर गोवा, महाराष्ट्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
साहित्य अकादमीने (Sahitya Academy award) दरवर्षीप्रमाणे यंदाही साहित्यातील मानाचे पुरस्कार जाहीर केले. विविध भाषांमधील ९ कवितासंग्रह, ६ कादंबऱ्या, ५ कथासंग्रह, ३ निबंध आणि एका टीकात्मक पुस्तकाला यंदा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यात कोकणी भाषेत गोव्यातील कोकणी साहित्यिक डॉ. पर्येकर यांच्या ‘वर्सल’ कथासंग्रहाला, तर कोल्हापुरातील साहित्यिक प्रा. कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला हे पुरस्कार जाहीर झाले. १२ मार्च २०२४ रोजी नवी दिल्लीतील कमानी ऑडिटोरियममध्ये होणाऱ्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
दरम्यान, डॉ. प्रकाश पर्येकर यांनी त्यांच्या परिसरात त्यांना भेटलेल्या पात्रांच्या दुःख, वेदना, आनंदामध्ये वैश्विक मूल्यांच्या खुणा पाहिल्या आणि त्या पात्रांना कथांमध्ये रंगवले. त्यांच्या अनेक कथांचे हिंदी, मल्याळम, मराठी, उडिया, उर्दू, कन्नड, काश्मिरी अशा वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये तसेच इंग्रजी आणि पोर्तुगीज भाषेतदेखील अनुवाद झालेले आहेत. ‘खुरीस’, ‘चंद्रकोर’ आणि ‘काजरो’ या त्यांच्या कथांवर चित्रपटही तयार झाले आहेत. ‘काजरो’ कथेवरील चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.
पन्हाळा-कोल्हापूरमधील निकमवाडी गावचे रहिवाशी असलेले प्रा. कृष्णात खोत हे नव्वदोत्तरी काळातील महत्त्वाचे कादंबरीकार मानले जातात. ग्रामजीवनाला केंद्रस्थानी ठेवून तेथील लोकांचे जगणे, दु:खे त्यांच्या कादंबरीत येतात. त्यामुळे त्यांच्या ‘रिंगाण’सह ‘गावठाण’, ‘रौंदाळा’, ‘झड-झिंबड’, ‘धूळमाती’ या कादंबऱ्यांची सर्वत्र चर्चा होत आहे.