कुंकळकर, बर्रेटो यांना ‘साहित्य अकादेमी’
पणजी :
केंद्रीय साहित्य अकादेमीच्यावतीने प्रदान करण्यात येणार्या बाल आणि युवा पुरस्कारांच्या 2022 सालच्या मानकर्यांची आज दिल्ली येथे घोषणा करण्यात आली. कोंकणी भाषेतील साहित्य निर्मितीसाठी प्रसिध्द कलाकार आणि लेखिका ज्योती कुंकळकर यांना ‘मयुरी’ या कादंबरीकेसाठी बाल साहित्य पुरस्कार आणि फादर मायरॉन बर्रेटो यांना ‘तालो- द व्हॉईस’ या लेखसंग्रहासाठी युवा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
अभिनेत्री, निर्मात्या, निवेदिका, अनुवादिका, लेखिका अशी बहुविध ओळख असलेल्या ज्योती कुंकळकर यांची कोंकणी, मराठी भाषेमध्ये आजवर 33 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पुरस्कारप्राप्त ‘मयुरी’ ही कादंबरी एका अनाथ मुलीच्या संघर्षाची गोष्ट असून, मायेची पाखरं हरवल्यानंतर मामांकडे राहून कष्ट करून पोलिस अधिकारी होण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास यात मांडला आहे.
तर युवा साहित्य पुरस्कार प्राप्त मायरन जेसन बार्रेटो हे काणकोण येथील रहिवासी असून त्यांची आजवर साहित्यिक, वैचाकिर आणि धार्मिक विषयांवर 16 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘तालो – द व्हॉईस’ या लेखसंग्रहामध्ये त्यांनी विविध विषयांवर लेखन केले आहे.
प्रत्येकी 50 हजार रूपये, साहित्य अकादेमीचे मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून बालसाहित्याच्या पुरस्कार बालदिनी, 14 नाव्हेंबर 2022 रोजी नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात येणार आहे.
बाल साहित्यासाठी दत्ता दामोदर नायक, हरिश्चंद्र नागवेकर, शीला कोळंबकर यांनी परिक्षण केले. तर युवा साहित्यासाठी किरण म्हांब्रे, एस. एम. कृष्णा राव, शैलेंद्र मेहता यांनी परिक्षण केले.