
देवेंद्र फडणवीस यांनी केले ‘स्क्रीन अकादमी’चे उद्घाटन
मुंबई : इंडियन एक्सप्रेस ग्रुप आणि स्क्रीन या प्रकाशन संस्थेने बुधवारी स्क्रीन अकॅडमीची घोषणा केली आहे. व्यावसायिक प्रगतीसाठी या अकॅडमीची उभारणी होत नसल्याचे अकॅडमीच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. नवोदित कलाकारांना योग्य व्यासपीठ देणे स्क्रीन अकॅडमीचे मुख्य उद्दिष्ट आहे. संस्था भारतीय चित्रपटसृष्टीतील करिअर घडवू इच्छिणा-या नवोदित कलाकारांना त्यांचे कौशल्य विकसित करण्यात मदत करेल, त्यांना मार्गदर्शन करेल.
कान्स आणि ऑस्कर पुरस्कार विजेते गुनीत मोंगा, पायल कपाडिया, रेसुल पुकुट्टी तसेच ज्येष्ठ पटकथा लेखक अंजुम राजाबली आदी मान्यवर या स्क्रीन अकॅडमीचे सदस्य म्हणून काम पाहतील. येत्या काळात अनेक प्रतिथियश व्यक्ती या संस्थेशी जोडली जाणार आहेत. स्क्रीन अकॅडमी भारतीताल प्रमुख चित्रपट संस्थांसोबत काम करेल. या माध्यमातून भारतातील नव्या प्रतिभावान चित्रपट निर्मात्यांना जागतिक स्तरावरील चित्रपट निर्मितीचे शिक्षण देता येईल. या शिक्षणातून नवोदितांना आपली कला सादर करण्याच्या अनेक संधी निर्माण होतील. या नव्या चेह-यांची स्वतंत्र ओळख निर्माण होईल, असा विश्वास स्क्रीन अकॅडमीच्यावतीने व्यक्त करण्यात आला.
लोढा फाऊंडेशनचे संस्थापक अभिषेक लोढा यांनी या अकॅडमीच्या उभारणीसाठी आर्थिक साहाय्य केले. स्क्रीन अकॅडमी नवोदित कलाकारांना चित्रपटाशी संबंधित मूलभूत शिक्षण देईल. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी थेट अर्ज करता येणार नाही. त्यांना यापूर्वी सिनेमाचे प्रशिक्षण देणा-या संस्थांच्यावतीने शिष्यवृत्तीसाठी शिफारस करावी लागेल. अर्जप्रक्रियेचा तपशील www.screenacademy.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
“योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी स्क्रीन अकॅडमीची उभारणी होत आहे, या शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्क्रीन अकॅडमीची प्रशंसा केली. मुंबई शहराचे चित्रपटसृष्टीशी अतूट नाते आहे. अगदी गरजेच्या वेळी योग्य ठिकाणी या अकॅडमीची उभारली जात आहे. द इंडियन एक्सप्रेस ग्रुपतर्फे सुरु होणी स्क्रीन अकॅडमी ही संस्था ना-नफा तत्त्वार सुरु होत असल्याचे ऐकून मला अतिशय आनंद झाला. या अकॅडमीतून शिकणारे नवोदित आणि प्रशिक्षित चित्रपटकर्मी भारतीय चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान देतील. या नव्या प्रतिभावंत कलाकारांमुळे भारतीय चित्रपटसृष्टीचा वेगाने विकास होईल, ” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे कार्यकारी संचालक आनंद गोएंका यांनी स्क्रीन अकॅडमीच्या उभारणीमागील आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “आम्ही स्क्रीन अकॅडमीच्या माध्यमातून मनोरंजन आणि संस्कृतीच्या क्षेत्रात उत्कृष्टतेला संस्थात्मक स्वरुप देण्याच्या दिशेने टाकलेले धाडसी पाऊल आहे. या संस्थेतून आम्ही उत्कृष्ट कलाकारांचा सन्मान करु. कलाकारांना आर्थिक मदतीसह आवश्यक संसाधनेही पुरवली जातील.”
लोढा फाऊंडेशनचे संस्थापक अभिषेक लोढा यांनी सांगितले, “आपल्या देशातील कलाक्षेत्राचा विकास साधत आपण इतर देशांवर प्रभाव टाकण्याची क्षमता ठेवतो. या कामासाठी स्क्रीन अकॅडमीचे कार्य फार महत्त्वाचे आहे. यामुळे आपला देश सर्जनशील कलाक्षेत्रात जागतिक पातळीवर आघाडी घेऊ शकतो. लोढा फाऊंडेशन २०२७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी सर्वतोपरि पाठिंबा देत आहे. चित्रपट आणि सर्जनशी कला हे आपल्या देशाची प्रमुख ताकद आहे. या दोन्ही क्षेत्रांमध्ये भारताला जागतिक पातळीवर आघाडी मिळवून देण्यासाठी स्क्रीन अकॅडमी महत्त्वाची भूमिका बजावेल. या महत्त्वकांक्षी उपक्रमात स्क्रीन अकॅडमीसोबत भागीदारी करताना लोढा फाऊंडेशनला आनंद होत आहे.”