‘हद्दवाढ भागातील विकासकामांमध्ये तडजोड चालणार नाही’
सातारा (महेश पवार) :
किल्ले अजिंक्यतारावर सकाळी, सायंकाळी चालण्यासाठी, व्यायामासाठी जाणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे पालवी चौक, रामराव पवार नगर ते अजिंक्यतारा या रस्त्याचे रुंदीकरण रिंगरोड पद्धतीने केले जाईल. या भागामध्ये सुरु असलेली विकासकामे दर्जेदार झाली पाहिजेत. यामध्ये कोणतीही तडजोड चालणार नाही, अशा सक्त सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा पालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या.
त्रिशंकू भागात सुरु असलेली कामे आणि उर्वरित समस्या याची पाहणी आ. शिवेंद्रसिंहराजेंनी केली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यंकटराव मोरे, शेखर मोरे- पाटील, आंनदराव कणसे, रवी पवार, फिरोज पठाण, बाळासाहेब महामूलकर, आबा जगताप, बंटी सुर्वे, अमोल नलवडे, प्रकाश घुले, गणेश निकम, अमोल कदम, पंत चव्हाण, श्रीकांत जाधव, बाळूनाना मोरे, संदीप पिसाळ, पोपट मोरे, युवराज जाधव, नाना चव्हाण, विकास नलावडे, अविनाश माने, नीतीराज सूर्यवंशी आदी मान्यवरांसह पालिकेचे नगर अभियंता दिलीप चिद्रे आणि कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
गोडोली येथील पालवी चौक ते रामराव पवार नगर ते किल्ले अजिंक्यतारा कडे जाणारा रस्ता रिंगरोड धर्तीवर रुंद करणे, या रस्त्यावरील जुने पूल काढून नवीन मोठे पूल बांधणे याशिवाय या परिसरातील आवश्यक ठिकाणी रस्ता रुंदीकरण, पूल मोठे करणे, ओढे स्वच्छ करणे, किल्ले अजिंक्यतारा रस्त्याच्या बाजूने लोकांना चालण्यासाठी फुटपाथ बांधणे या कामाचे तातडीने इस्टिमेट करण्याच्या सूचना आ. शिवेंद्रसिंहराजेंनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या.
या कामांसाठी लागणार निधी राज्य शासन अथवा जिल्हा नियिजन समितीमधून मंजूर केला जाईल, असे ते म्हणाले. तसेच सुरु असलेली कामे दर्जेदार झाली पाहिजेत. कोणताही कॉन्ट्रॅक्टर असला तरी कामांच्या दर्जाबाबत तडजोड करू नका, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.