
जुने गोवेचा विकास होतोय बफर झोनच्या बाहेर : रोहन खंवटे
पर्यटन मंत्री रोहन ए. खंवटे यांनी स्पष्ट केले आहे, की प्रशाद योजनेअंतर्गत हे विकासकाम पूर्णपणे बफर झोनच्या बाहेर होत आहे आणि त्यात जुने गोवे येथे मॉल बांधण्याच्या कामाचा समावेश नाही. ते म्हणाले, की “हा प्रकल्प जुने गोवे येथील वारसा जपताना पर्यटकांना सुविधा वाढवण्यावर केंद्रित आहे. या ठिकाणी विकसित केले जाणारे सुविधा केंद्र हे पूर्णपणे वारसा स्थळाच्या बफर झोनच्या बाहेर आहे आणि यासाठी सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत.”
पंचायतीच्या परवानगी संदर्भात, पर्यटन मंत्र्यांनी स्पष्ट केले, की पंचायतीला एनओसीसाठी २२ ऑगस्ट २०२३ रोजी अर्ज करण्यात आला होता. यासाठी ५ सप्टेंबर २०२३ रोजी, एनएमए आणि एएसआयने दिलेली एनओसी पंचायतीला सादर करण्यात आली आणि २९ ऑक्टोबर २०२३ रोजी ग्रामसभेदरम्यान, आराखडा सादर करण्यात आला, त्यानंतर पंचायतीच्या सूचना मांडण्यात आल्या होत्या. एएसआयने आवश्यक सूचना दिल्यानंतर येथे बांधकाम सुरू करण्यापूर्वी सर्व आवश्यक परवानग्या घेतल्या जातील व त्यानंतर चर्च अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा विश्वासात घेतले जाईल.
या प्रकल्पासंदर्भात पसरलेल्या चुकीच्या माहितीला संबोधित करताना, मंत्री खंवटे यांनी बॅसिलिकाजवळ मॉल बांधल्याच्या दाव्याचे जोरदार खंडन केले आणि लोकांनी धार्मिक आधारावर या मुद्द्याचे राजकारण करू नये, असे सांगितले. त्यांनी निदर्शनास आणून दिले की एक्स्पोजीशन दरम्यान, बफर झोनमध्ये आणि बाहेर कोणत्याही आक्षेपाशिवाय ३०० कोटींची कामे करण्यात आली होती. सध्याच्या उपक्रमात जुने गोवेतील चर्चना भेट देणाऱ्या पर्यटकांना मदत करण्यासाठी एक सुविधा केंद्र समाविष्ट आहे, ज्यामुळे यात्रेकरू आणि अभ्यागतांना एक संरचित व सुव्यवस्थित अनुभव मिळेल.
मंत्री पुढे म्हणाले, की बॅसिलिका आणि आर्चडायोसीसच्या प्रतिनिधींसह चर्च अधिकारी, सुविधा केंद्राच्या नियोजनात आणि अंतिमीकरणात सक्रियपणे सहभागी होते. त्यांनी मॉलच्या बांधकामाबाबत जाणीवपूर्वक पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीचा निषेध केला आणि नागरिकांमध्ये अनावश्यक गोंधळ टाळण्यासाठी, या अफवा सुरू करणाऱ्यांची चौकशी करण्याचे आवाहन पोलिसांना केले आहे.
जुने गोवे येथे पर्यटकांना चांगला अनुभव देताना सर्व विकास हा नियमांनुसार होत असल्याची खात्री करून, वारसा संवर्धन आणि जबाबदार पर्यटनासाठी राज्याची वचनबद्धता कायम आहे.