
सत्य, न्याय आणि ‘सीलबंद लिफाफा’ यांचाच विजय होईल – प्रभव नायक
मडगाव: मडगांवचो आवाजने भिवसा, कुंकळ्ळी येथील एका महिला याचिकाकर्त्यास करण्यात आलेल्या कथित धमकीच्या फोन कॉलचा तीव्र निषेध केला आहे. संबंधित याचिकाकर्त्याने मडगाव नगरपालिकेच्या भरती प्रक्रियेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. युवा नेते प्रभव नायक यांनी या घटनेला “अत्यंत गंभीर व चिंताजनक” संबोधत दोषींवर तात्काळ आणि कडक पोलिस कारवाईची मागणी केली आहे.
महिला याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात दाद मागितल्यामुळे तिला फोनवरून धमकी दिल्याची तक्रार केल्याच्या पार्श्वभूमीवर प्रभव नायक म्हणाले की, पारदर्शकतेसाठी आवाज उठवणाऱ्यांना गप्प बसवण्याचा हा प्रयत्न आहे. “न्यायासाठी लढणाऱ्या नागरिकाला धमकावणे म्हणजे लोकशाही आणि कायद्याच्या प्रणालीवरच हल्ला आहे,” असे ते म्हणाले.
मडगाव नगरपालिकेच्या भरती प्रक्रियेवर गेल्या अनेक महिन्यांपासून संशयाची छाया असल्याचे त्यांनी नमूद केले. याचिकाकर्त्यावर दबाव आणणे किंवा तिला त्रास देणे हे प्रक्रियेत गैरप्रकार आणि सत्तेचा गैरवापर झाल्याच्या शंकेला अधिक बळ देते, असेही प्रभव नायक म्हणाले.
८ नोव्हेंबर २०२४ रोजी आपण काही उमेदवारांची नावे असलेला एक सीलबंद लिफाफा तयार करून ठेवला असल्याची आठवण प्रभव नायक यांनी करून दिली. त्यांच्या मते, नगरपालिका मंडळ स्थापन करण्यास पाठिंबा दिल्याच्या मोबदल्यात काहींना नोकऱ्या देण्याचे आश्वासन मडगावचे पक्षबदलू आमदार व साबाखा मंत्री दिगंबर कामत यांनी दिले होते. हा लिफाफा पत्रकारांच्या साक्षीने सीलबंद करण्यात आला असून त्यावर त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
“योग्य वेळी हा सीलबंद लिफाफा स्वतःच सत्य मांडेल. सत्य कायम दडपून ठेवता येत नाही. भरती प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष असेल, तर कुणालाही भीती बाळगण्याचे कारण नाही,” असे प्रभव नायक यांनी न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास व्यक्त करत सांगितले.
मडगांवचो आवाजने या कथित धमकीप्रकरणी सखोल व निष्पक्ष चौकशीची मागणी केली असून संबंधित याचिकाकर्त्याला सुरक्षा देण्याचे सरकारला आवाहन केले आहे. “सत्य आणि न्याय यांचा विजय निश्चित आहे. दबाव किंवा धमक्यांमुळे आमचा लढा थांबणार नाही,” असे प्रभव नायक यांनी शेवटी ठामपणे सांगितले.


