‘ईडीची चौकशी का लागली, उत्तर द्या’
सातारा (महेश पवार) :
सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचाराबाबत बोलताना खा. उदयनराजे भोसले यांनी जिल्हा बँकेच्या कारभाऱ्यांवर जोरदार टीका केली. तुम्ही म्हणता जिल्हा बँक नावाजलेली बँक आहे, तर मग ईडीने चौकशीचं पत्र का पाठवलं? ईडीचे लोक मुर्ख आहेत काय? याचं बँक उत्तर का देत नाही, असा सवाल करुन बँकेचे सीईओ राजेंद्र सरकाळे हा माणूस तर डोमकावळा आहे, अशा शब्दात बँकेच्या कारभाऱ्यांचा समाचार खा. उदयनराजेंनी घेतला.
सातारा बाजार समिती निवडणुकीत खा. उदयनराजेंनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेतकरी पॅनेलला जाहीर पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात जलमंदीर या त्यांच्या निवासस्थानी शुक्रवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत खा. उदयनराजेंनी सहकार क्षेत्रातील भ्रष्ट कारभारावर ताशेरे ओढले. शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार चळवळ सुरू करण्यात आली. परंतु भ्रष्टाचारामुळे अनेक बँका आर्थिकदृष्ट्या डबघाईस आल्या आहेत.
शेतकऱ्यांना बाजार समितीचा काहीही फायदा होताना दिसत नाही. कोण कुठल्या व्यापारी व व्यावसायिकांना बाजार समितीचे गाळे दिले जात आहेत. तुम्ही म्हणता सातारा जिल्हा बँक नावाजलेली बँक आहे, तर मग ईडीने चौकशी का लावली? ईडीचे लोक मूर्ख आहेत का? याचे उत्तर बँकचे कारभारी का देत नाहीत, असा खडा सवाल उपस्थित करून खा. उदयनराजेंनी बँकेच्या कारभाऱ्यांवर जोरदार टीका केली.
याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्यासह शेतकरी पॅनलचे उमेदवार उपस्थित होते.