‘शिवसंग्राम’ नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन
मुंबई:
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ शिवसंग्राम पक्षाचे मेटे यांच्या कारला भीषण अपघात झाला. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी मेटे यांना मुंबईला हलविण्याबाबत डॉक्टरांशी चर्चा केली. मात्र, डॉक्टरांनी त्यांना निधन झाल्याची कल्पना दिली. डॉ. धर्मांग यांनी मेटे यांचे निधन झाल्याचे जाहीर केले.
या घटनेनं महाराष्ट्रासह बीड जिल्ह्याला मोठा धक्का बसला आहे. आपल्या नेत्यांच्या निधनाचे वृत्त कार्यकर्त्यांची झोप मोडणारे होते, ही बातमी समजताच बीडमधील कार्यकर्त्यांनी शिवसंग्राम भवनावर धाव घेतली आहे.
विनायक मेटे हे चळवळीतील नेते होते, मराठा आरक्षणासाठी त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा लढा सुरू होता. त्यामुळे, मराठा समाजासाठी आणि मराठा आरक्षण आंदोलकांनाही या घटनेनं मोठं दु:ख झालं आहे. या निधनाची बातमी कळताच अनेकांनी एकमेकांशी फोनवरुन संपर्क केला, तर काहींनी बीडहून मुंबईकडे धाव घेतल्याचे समजते.
विनायक मेटेंच्या अपघाती निधनाचे वृत्त सर्वांनाच धक्कादायक आहे. मेटेंची कर्मभूमी असलेल्या बीड जिल्ह्यात बातमी समजताच त्यांच्या समर्थकांनी शिवसंग्राम भवन कार्यालयावर गर्दी केली आहे. या घटनेनं कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली असून अनेक कार्यकर्ते धाय मोकलून रडत आहेत.
दरम्यान, विनायक मेटेंचे भाऊ राम हरी मेटे हे शिवसंग्राम भवन येथे दाखल झाले आहेत आणि या ठिकाणी शोक व्यक्त केला जातोय