विश्वजीत राणे ‘हे’ धाडस करतील का ? : अमरनाथ पणजीकर
भाजपच्या गाभा समितीच्या बैठकीत नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे यांनी आमदार आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिफारस केलेल्या सर्व जमीनींचे रुपांतरण केल्याचे वर्तमानपत्रातील बातम्यांमधून समोर आले आहे. सदर आमदार व पदाधिकाऱ्यांची नावे उघड करण्याचे धाडस ते करतील का? तसे न केल्यास सुटकेस-टू-सूटकेस तत्त्वावर विश्वजीत राणेंनी जमिनी रुपांतरीत केल्या, हे स्पष्ट होईल, असा दावा काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.
भाजपचा गोव्यातील प्रत्येक इंच जमिनीवर डोळा असून त्या जमिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या क्रोनी कॅपिटलिस्ट मित्रांना विकण्याचा त्यांचा डाव आहे ह्या काँग्रेस पक्षाच्या भूमिकेला नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे यांच्या खुलाशाने पुष्टी मिळाली आहे असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.
टीसीपी मंत्री विश्वजित राणे यांनी केलेला दावा भाजपचे आमदार आणि पदाधिकारी फेटाळतात का, हे आता पाहायचे आहे. त्यांनी मौन पाळले तर हे सर्व गोव्यातील जमीन रुपांतरणाचे गुन्हेगार आहेत ते निश्चित होईल, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.
गोव्यातील जनतेला भाजपचा विनाशकारी अजेंडा समजून घेण्याची वेळ आली आहे. भाजपने सुरू केलेले सर्व प्रकल्प केवळ त्यांची तिजोरी भरण्यासाठी आहेत, राज्याच्या कल्याणासाठी नाहीत. भ्रष्ट टीसीपी मंत्री विश्वजित राणे यांनी हरित विभागातील मोठ्या जमिनीचे सेटलमेंट झोनमध्ये रूपांतर केले आहे, असा आरोप अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.
टीसीपीचे मंत्री विश्वजित राणे यांना मोठमोठी वक्तव्ये करून खळबळ माजवण्याची सवय आहे. आपल्या दाव्याबाबत ते गंभीर असतील तर त्यांनी भाजपचे मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार रुपांतरण केलेल्या मालमत्ता आणि जमिनींचा सर्व डेटा सार्वजनिक करावा, अशी मागणी अमरनाथ पणजीकर यांनी केली.