
हिंदूंना मिळतेय ‘या’ देशाचे मोफत नागरिकत्व!
बलात्काराच्या आरोपावरून फरार असलेला नित्यानंद आपल्या तथाकथित देश कैलासाचे नागरिकत्व वाटप करत आहे. यासाठी त्याने लोकांना व्हेरिफाईड सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट शेअर करून नागरिकत्व घेण्याचे आवाहन केले जात आहे.
कैलासच्या पेजवरून मोफत नागरिकत्व घेता येईल, असा दावा करण्यात आला आहे. मात्र, नागरिकत्व घेतल्यावर कैलासात कसे पोहोचाये आणि तिथेच स्थायिक कसे होणार? याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
“तुम्ही जर हिंदू धर्माचे पालन करत असाल किंवा हिंदू विचारधारा असलेल्या गटात सामील व्हायचे असेल तर तुम्ही कैलासाचे ई-नागरिकत्व मोफत घेऊ शकता. हे घेऊन तुम्ही जागतिक हिंदू कुटुंबाचा भाग बनू शकता.” असे ट्विट नित्यानंदांनी केले आहे.
कैलासाच्या अधिकृत अकाऊंटवरून नागरिकत्वाबाबत अनेक ट्विट करण्यात आले आहेत. नागरिकत्वासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक पेज उघडेल. यामध्ये पहिल्या कॉलममध्ये नाव, नंतर ई-मेल, पत्ता, शहर, राज्य, देश, व्यवसाय आणि नंतर फोन नंबर असे पर्याय आहेत. नागरिकत्व घेण्यासाठी ही सर्व माहिती मागवली जात आहे.
बलात्काराचा आरोप झाल्यानंतर नित्यानंद घाबरून देश सोडून पळून गेला. त्याला फरारी घोषित करण्यात आले. यानंतर त्यांनी दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोर या देशात जाऊन जमिनीचा तुकडा विकत घेतला आणि तो आपला देश म्हणून घोषित केला. देशाला ‘कैलास’ असे नाव देण्यात आले.
नित्यानंद त्याला ‘हिंदू राष्ट्र’ म्हणतात. कैलासाच्या वेबसाईटचा दावा आहे की या देशात छळलेल्या हिंदूंना जगभरातून संरक्षण दिले जाते. येथे राहणारे हिंदू जात, लिंग असा कोणताही भेद न करता शांततेने राहतात. स्वतःची रिझर्व्ह बँक, स्वतःचे चलन आणि स्वतःचे स्वतंत्र संविधान असल्याचा दावाही कैलासा करतो.