
‘राम निवासचे स्वागत, मुंबईत गोवा भवनची नितांत गरज’
मडगाव:
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अयोध्येत “राम निवास” बांधण्याच्या घोषणेचे स्वागत केले आहे. मी गोवा सरकारला वाशी, नवी मुंबई येथे आधीच खरेदी केलेल्या जागेवर “गोवा भवन” बांधण्याची प्रक्रिया जलद करण्याची विनंती करतो ज्यामुळे गोव्यातील लोकांना, विशेषतः दीर्घकालीन आजाराच्या वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईला जाणाऱ्यांना आवश्यक असलेला दिलासा मिळेल, असे मडगावचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी अयोध्येत भाविकांसाठी समर्पित भवन बांधण्यासाठी गोवा सरकारने जमीन खरेदी करण्याच्या केलेल्या घोषणेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, प्रभव नायक म्हणाले की, मुंबईला भेट देणाऱ्या गोव्यातील लोकांचे त्रास आणि वेदना कमी करण्यासाठी सरकारने आता त्वरित पावले उचलली पाहिजेत.
उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छिणारे विद्यार्थी व्हिसा औपचारिकतेसाठी मुंबईला भेट देतात. परदेशात नोकरीसाठी जाणारे तरुणही कागदोपत्रीय औपचारिकता पूर्ण करण्यासाठी मुंबईत जातात. गोव्यातील रुग्णांसह त्यांच्याबरोबर गेलेल्या नातलगांना मुंबईत परवडणारी राहण्याची सोय मिळण्यात अडचणी येतात. अशा सर्व लोकांसाठी निवास व्यवस्था बांधण्याची तातडीची गरज आहे, असे प्रभव नायक म्हणाले.
नवी मुंबईतील वाशी येथील भूखंड राज्य अतिथीगृह आणि एम्पोरियमच्या बांधकामासाठी खरेदी करण्यात आला होता. माझ्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, जीएसआयडीसीने सरकारला कळवले आहे की नवी मुंबई महानगरपालीकेला थकबाकी असलेला मालमत्ता कर भरल्यानंतर आणि सिडकोने बांधकामासाठी मुदत वाढवल्यानंतरच वैधानिक मंजुरीसाठी प्रस्ताव प्रक्रिया करता येईल आणि वैधानिक मंजुरी मिळाल्यानंतरच कामाची निविदा देता येईल, असे प्रभव नायक यांनी नमूद केले.
माझ्याकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांवरुन स्पष्ट होते की ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २०.७१ कोटी रुपयांचा थकबाकी असलेला मालमत्ता कर गोवा सरकारकडून देय होता. सरकारने यावर त्वरित उपाययोजना काढावी आणि गोमंतकीयांसाठी निवासव्यवस्थेचे बांधकाम सुरू करावे, अशी मागणी प्रभव नायक यांनी केली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ताबडतोब याची दखल घेवून गोमंतकीयांना दिलासा देतील व लोकांचे हाल संपवतील अशी आशा प्रभव नायक यांनी व्यक्त केली आहे.