
समुद्रकिनाऱ्यांवरील दलाल आणि बेकायदेशीर व्यवसायांवर कारवाई
पणजी :
गोवा सरकारचे पर्यटन खाते राज्याच्या समुद्रकिना-यावरील दलाल आणि अवैध धंद्यांच्या उपद्रवाविरुद्ध कठोर कारवाई करत आहे. या कारवाईचा उद्देश पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि त्यांना गोव्यात चांगला अनुभव देणे, हा आहे. तसेच यातून केवळ अधिकृत व्यवसायच नियुक्त क्षेत्रांमध्ये काम करतील, याची खात्री केली जाणार आहे.
दलाल आणि अनधिकृत विक्रेत्यांना समुद्रकिनाऱ्याच्या ठिकाणी काम करण्यापासून रोखण्यासाठी खात्याने शॅक चालक, बीच असोसिएशन आणि इतर भागधारकांना निर्देश जारी केला आहे. बीच असोसिएशनने उपस्थित केलेल्या चिंतेला प्रतिसाद म्हणून, त्यांना सक्रिय उपाययोजना करण्यास सांगितले आहे. ते समुद्रकिनाऱ्यावरील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरल्यास, पर्यटन खाते स्वतः या अनधिकृत क्रियाकलापांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी कायदेशीर यंत्रणेसह पाऊल उचलणार, असे सांगण्यास आले आहे.
शिवाय, बीच शॅक चालकांना त्यांच्या परिसरात कोणतेही अवैध धंदे चालणार नाहीत, याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पर्यटन खाते अशा समस्यांना प्रभावीपणे हाताळण्यासाठी, बीच असोसिएशनना सक्षम करण्याच्या दृष्टीने कठोर नियम लागू करण्यास पावले उचलत आहे.
यासंदर्भात बोलताना, पर्यटन संचालक केदार नाईक म्हणाले, कि “पर्यटन खाते गोव्यात त्रासमुक्त आणि पर्यटकांसाठी अनुकूल असे वातावरण साध्य करण्यास काम करत आहे. एक प्रीमियम पर्यटन स्थळ म्हणून राज्याचा नावलौकिक राखण्यासाठी, समुद्रकिनाऱ्यांवरील दलाल आणि बेकायदेशीर व्यवसायांच्या समस्येला प्रभावीपणे सामोरे जाणे महत्त्वाचे आहे. अभ्यागतांना कोणत्याही त्रासाशिवाय आमच्या समुद्रकिनाऱ्यांचा आनंद घेता यावा, यासाठी आम्ही अशा ठोस उपाययोजना आखत राहू.”
पर्यटक आणि भागधारकांना बीच व्हिजिल ॲपवर दलाल-संबंधित तक्रारी नोंदवण्यास प्रोत्साहित केले जात आहे. अभ्यागतांसाठी अखंड, त्रास-मुक्त अनुभव सुनिश्चित करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे.