google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

”हा’ तर भाजपचा निवडणुक जुमला परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न’

पणजी :
भाजप सरकारने 2012 मध्ये गोमंतकीय आणि बेरोजगार युवकांना खोटी आश्वासने देऊन सत्ता बळकावली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील तरुणांना “मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी योजना” द्वारे रोजगाराच्या संधी देण्याची केलेली घोषणा म्हणजे भाजपचा निवडणूक जुमला परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला.काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर हळदोणचे आमदार अॅड. कार्लोस आल्वारीस फेरैरा, केपेंचे आमदार एल्टन डिकोस्ता तसेच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासमवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत युरी आलेमाव यांनी आगामी विधानसभा अधिवेशनात भाजप सरकारला उघडे पाडण्यासाठी आणि कामकाजाची रणनीती ठरवण्यासाठी आपण लवकरच सर्व सात विरोधी आमदारांची बैठक बोलविणार असल्याचे स्पष्ट केले.

भाजपने 2012 मध्ये खाणकाम, बेरोजगारी संपविण्याचे आणि अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात भाजप सरकारने राज्याला दिवाळखोरीत ढकलले आणि आर्थिक आणीबाणी निर्माण केली. असंवेदनशील भाजप सरकार इव्हेंट मॅनेजमेंट आणि प्रसिद्धीवर करोडो रुपये खर्च करत आहे परंतू समाजकल्याण योजनांचे लाभार्थी, माध्यान्ह आहार पुरवठादार तसेच शिक्षकांना त्यांचे हक्काचे आर्थिक सहाय्य, देयके आणि पगारापासून वंचित ठेवत आहे, याकडे युरी आलेमाव यांनी लक्ष वेधले.

मुख्यमंत्री अ‍ॅप्रेंटिसशिप योजना ही भाजप सरकारची तरुणांना मुर्ख बनविण्याचा आणखी एक जुमला आहे. या योजनेला 17 फेब्रुवारी 2021 रोजी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये एक विधान केले की गोव्यातील युवकांनी कामगार आणि रोजगार खात्यामार्फत प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्यांना निश्चित मुदतीचा रोजगार मिळेल आणि त्यांना किमान वेतन रु. 15000/- दिले जाईल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 12 जून 2023 रोजी युवकांना रु. 8000/- ते रु. 10000/- पर्यंत वेतनाचा पंतप्रधान प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत रोजगार देण्याची घोषणा केली याकडे युरी आलेमाव यांनी लक्ष वेधले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 23 जून 2023 रोजी एक ताजे विधान केले असून “मुख्यमंत्री एप्रेंटिस योजना व धोरणाच्या” अंतर्गत 10000 युवकांना सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात शिकाऊ म्हणून नियुक्त केले जाईल असे म्हटले आहे. यावरून डॉ.प्रमोद सावंत स्वतः गोंधळलेले असल्याचे दिसून येते, असा टोला  युरी आलेमाव  यांनी हाणला.

एप्रेंटिस प्रशिक्षणार्थी योजना भाजप सरकार जुलै 2021 ते जून 2023 या कालावधीत  का राबवू शकले नाही? शासनाने सदर योजना अधिसूचित केली आहे का आणि योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पीय तरतुदी केल्या आहेत का? असा प्रश्न युरी आलेमाव  यांनी  विचारला.

काँग्रेस विधीमंडळ पक्षाने आजच्या बैठकीत म्हादई, खाण व्यवसाय, पर्यावरणाचे प्रश्न, वाढत्या किमती, कायदा व सुव्यवस्था ढासळणे, इव्हेंट आयोजनांवर होणारा वायफळ खर्च, भ्रष्टाचार, पर्यटन उद्योगासमोरील संकट, वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, आपत्ती व्यवस्थापनची आकार्यक्षमता या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांवर नजर ठेवून गोव्यात जातीय तेढ पसरवण्याचे भाजपचे जाणीवपूर्वक प्रयत्न हाणून पाडण्याचे ठरविण्यात आले.

येत्या विधानसभा अधिवेशनात सर्व विरोधी आमदारांच्या सहकार्याने भाजप सरकारला कोंडित पकडण्यासाठी आम्ही रणनिती करणार आहोत. त्यासाठी सर्व सात आमदारांची लवकरच बैठक घेण्यात येईल असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!